Talegaon : तळेगाव स्टेशन भागात महिला कोरोना पॉझिटिव्ह; शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या 13

female corona positive in Talegaon station area; The number of active patients in the city is 13

एमपीसीन्यूज – तळेगाव स्टेशन परिसरातील एका पुरुषाचा वैद्यकीय अहवाल मंगळवारी (दि 23) कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. प्रवीण कानडे व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

तळेगाव स्टेशन येथील 50 वर्षीय पुरुष व त्यांचा 21 वर्षीय मुलगा चिंचवड येथील एका गॅस एजन्सीमध्ये कामाला होता. या एजन्सीमध्ये कामाला असलेल्या सर्वांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. यामध्ये तळेगाव स्टेशन येथील पुरुषचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता, तर  त्यांच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाला ताथवडे येथील बालाजी कॉलेज केव्हीड-19  कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर त्यांच्या मुलाला सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्राच्या कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, या कोरोनाबाधित पुरुषाच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नी व दुसरा मुलगा यांना येथील सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात  उपचारासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या पत्नीचा व मुलाचा काल, मंगळवारी स्वॅब घेण्यात आला होता. आज, बुधवारी संबंधीत महिला कोरोना पॉझिटिव्ह, तर मुलगा निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच संक्रमित रुग्ण राहत असलेल्या भागात सूक्ष्म कंटेनमेंट झोन, तर परिसराचा इतर भाग बफर्स झोन म्हणून मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी जाहीर केला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्याआज अखेर 18 झाली आहे. यातील पाचजण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून सक्रिय रूग्णांची संख्या 13 असल्याचे मुख्याधिकारी झिंजाड यांनी सांगितले.

तसेच मावळातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 झाली असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला. 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सक्रिय रूग्णांची संख्या 31 असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

मावळात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार बर्गे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like