Talegaon : सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी द्यावी – नाभिक संघटनांची मागणी

एमपीसी न्यूज : गेले 56 दिवस केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद असल्याने ही सेवा देणारे कारागीर, सलून चालक आणि नागरिक हैराण झाले आहेत. प्रशासनाने अकारण भीतीचा बाऊ न करता सलून सुरू करण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी तळेगाव दाभाडे आणि परिसरातील नाभिक संघटनांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड व वरिष्ठ पोलीस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘आम्ही हतबल झालो आहोत, शासनाने दिलेले सर्व नियम, अटी यांचे तंतोतंत पालन करून शिस्तीने व्यवसाय करु, आम्हाला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी’ अशा प्रकारची भावना तळेगाव शहर नाभिक समाजाने आपल्या निवेदनात मांडली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत निवेदन देताना तळेगाव नाभिक विकास संस्थेचे गाव भाग अध्यक्ष श्रीमंत ताटे, स्टेशन विभाग अध्यक्ष सौरभ दळवी, त्याचबरोबर सभागृहनेते अमोल शेटे, संघटनेचे सदस्य चंद्रशेखर शिंदे, प्रशांत मोरे, श्रीनिवास राऊत, नितीन मोरे, विवेक गायकवाड, ओंकार शिंदे, आदि नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे, स्टेशन, माळवाडी या भागात 110 सलूनची दुकाने आहेत. त्यावर 350 कारागीर अवलंबून आहे. सदर दुकाने ही 22 मार्चपासून बंद आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेली दोन महिने प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियम व अटींचे आम्ही तंतोतंत पालन केले आहे. परंतु, सध्या हाताला काहीच काम नसल्याने व पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून असल्याने आम्हा सर्वांची आर्थिक दृष्ट्या व अन्य बाबतीत उपासमार होत आहे.

तसेच दुकानामध्ये काम करणारे कारागीर हे परप्रांतीय आहेत. त्यांना स्वतः गेली दोन महिने त्यांचे अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजा पुरविताना कसरत करावी लागत आहे.

जर ते परप्रांतीय कारागीर निघून गेले तर नाभिक व्यवसायाला मोठा धक्का बसणार आहे. यासाठी दिवसातून कमीत कमी चार तास तरी सलूनचे दुकान उघडून काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, वरिष्ठांना विचारून सकारात्मक विचार करू , असे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.

केशकर्तनालय बंदीमुळे सारेच हैराण झाले आहेत. नेहमी टिपटॉप राहणारे लोक आज हिप्पी झालेत. तर सलून दुकानदार आणि कारागिरांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. महिलांचे ब्यूटी पार्लरस् बंद असल्याने हे संकट गडद होत चालले आहे. आरोग्याच्या दृष्टीने केस कापणे, ते स्वच्छ व नीटनेटके ठेवणे गरजेचे असताना केवळ लॉकडाऊनच्या भोंगळ निर्णयामुळे वैयक्तिक स्वच्छतेचा हक्क देखील प्रशासनाने हिरावून घेतला आहे.

श्रीनिवास राऊत – माजी अध्यक्ष, नाभिक विकास संस्था.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.