BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ताललयीला रसिकांकडून टाळ्यांची उत्स्फूर्त दाद ‘अर्पण’

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – विद्युत गतीने तबल्यावर  थिरकणाऱ्या बोटांतून उमटणारा पं. योगेश शम्सी यांचा सुश्राव्य ताल आणि बेबी यांच्या  कथक कलेचा वारसा विनम्रतेने उलगडणारी आसावरी पाटणकर यांची नृत्यप्रस्तुती, अशा ताल व लयीच्या सुरेख अनुभूतीमुळे टाळ्यांची उत्स्फूर्त दाद रसिकांनी कलाकारांना ‘अर्पण ‘ केली.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उद्गार तर्फे ‘अर्पण’ मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे एकल सादरीकरण झाले. आध्यात्मिक गुरू सुनील काळे, नृत्यभारतीच्या अध्यक्षा सुनीता पुरोहित, प्रसिद्ध गायक पं. उदय भवाळकर, नीलिमा अध्ये, पं. सुरेश तळवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नीलिमा अध्ये यांच्यावरील स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. तसेच त्यांचा विशेष सत्कार ही यावेळी झाला. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आसावरी पाटणकर यांची एकल प्रस्तुती झाली. कथक परंपरेनुसार शिव वंदनेनंतर विलंबित तीनताल त्यांनी पेश केला. पं. मोहनराव कल्याणपूरकर, गुरू पं. रोहिणीताई भाटे अशा गुरू परंपरेतून प्राप्त केलेल्या रचना त्यांनी लीलया सादर केल्या. स्वरचनेतून सादर केलेल्या ठुमरीतून पाटणकर यांनी नृत्य व अभिनयावरील प्रभुत्वाचे विलक्षण दर्शन रसिकांना घडविले. यावेळी त्यांना अर्पिता वैशंपायन (गायन), पं. योगेश शम्सी (तबला), सुनील अवचट (बासरी), देवेंद्र देशपांडे(संवादिनी), नीलिमा अध्ये (पढंत) यांनी समर्पक साथ दिली.

तबल्यातील सर्वाधिक लोकप्रिय तालांपैकी एक आणि अनेक बंदिशींमध्ये वापरला जाणारा प्रसिद्ध असा तीन-ताल पं. योगेश शम्सी यांनी सादर केला. डग्यावर भिंगरीसारखी फिरणारी बोटं आणि त्यातून निघणारा गोड आवाज यामुळे रसिक भारावून गेले. काही कायदे, रेले, आणि पंजाब घराण्याच्या पारंपरिक रचना सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ताल आणि संवादिनीचा लेहरा याचा उत्तम मेळ साधत त्यांनी एकल वादनाची ही मैफल उत्तरोत्तर रंगवली.

HB_POST_END_FTR-A1
.