Navale Bridge Accident :नवले पुलाजवळ टँकरची 10 ते 15 वाहनांना धडक; पाच जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यातील नवले पुलाजवळ आज रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये भरधाव वेगातील टॅंकरने 10 ते 15 वाहनांना धडक दिली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला.  थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरने जवळपास 15 वाहनांना उडवत फरफटत नेले. यामध्ये 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूहुन पुण्याकडे निघालेल्या असलेल्या भरधाव वेगातील टँकरचे नवले पुलाजवळील उतारावर आल्यानंतर नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील वाहनांना उडविण्यास सुरुवात केली. टँकरने जवळपास 15 ते 16 वाहनांना उडवले. तर काही वाहनांना फरफटत नेले.

या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 12 ते 13 लोक जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई बंगलोर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सध्या बंद करण्यात आली.

अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. तर घटनास्थळी बघ्यांची देखील मोठ्या संख्येने गर्दी जमली आहे. अग्निशमन दलाचे जवान जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.