Pune News: पुण्यातील श्रींच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी हौद आवश्यक : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची मागणी

Tanks required for immersion of Ganesha idols in Pune: Demand of Congress, NCP, Shiv Sena.

एमपीसी न्यूज – पुण्यातील श्रींच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी हौद आवश्यक असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतर्फे म्हटले आहे. घरामध्ये श्रींचे विसर्जन करताना नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल. विसर्जनासाठी हौद उपलब्ध केल्याने पुणेकरांना श्रींचे विसर्जन सुखरपणे करता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत होईल.

यासाठी पुण्याच्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये गतवर्षी असलेल्या हौदामध्ये श्रींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी हौद उपलब्ध करावे, अशी मागणी विरोधीपक्ष नेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

पुण्यातील घरगुती श्रींचे विसर्जन करण्यासाठी यंदा कोठेही हौद असणार नाहीत. घरच्या घरीच श्रींचे विसर्जन करा. असा ऐतिहासिक निर्णय पुण्याच्या महापौरांनी घेतला, ही दुर्दैवी बाब आहे.

पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या मोठी आहे. त्यापेक्षाही खूप मोठी संख्या सुमारे चार लाख पेक्षा अधिक श्रींची प्रतिष्ठापना पुण्यात घरोघरी केली जाते.

त्यांचे विधिवत विसर्जन करणे देखील आवश्यक असते. हे विसर्जन मुठा नदी व कॅनॉलमध्ये केले जायचे. मात्र, पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन व नदीचे व कॅनॉलचे पाणी दूषित होऊ नये यासाठी सुमारे दहा-बारा वर्षापूर्वी जागोजागी हौद बांधून तेथे घरगुती श्रीं’चे विसर्जन करण्याची मोठी सोय केली गेली होती.

या व्यवहार्य योजनेचे सर्वत्र स्वागतच केले गेले होते व त्यामुळे मुठा नदी व त्यांवरील गर्दी कमी होऊन गतवर्षी सुमारे दोन लाख घरगुती श्रींचे हौदामध्ये विसर्जन केले गेले. विसर्जनासाठी लांब जाण्याचा नागरिकांना होणारा त्रास कमी झाला होता व अपघाताचे प्रमाणही नगण्य झाले होते.

आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना श्रींच्या विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या हौदाचा वापर करता येणार नाही. हा महापौरांचा एकतर्फी निर्णय पूर्णतः अव्यवहार्य व पुणेकरांच्या त्रासात भर घालणारा आहे.

सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्यासाठी आवश्यक त्या खुणा कराव्यात. नदीपात्र व कॅनॉल येथे होणारी संभाव्य गर्दी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता याबाबी लक्षात घेऊन महापौरांनी सर्व पक्ष नेत्यांची बैठक घेऊन आता एकतर्फी घेतलेला निर्णय रद्द करावा, अशीही मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.