Mumbai News : टास्क फोर्सचा पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याला हिरवा कंदील, अंतिम निर्णय आज

एमपीसी न्यूज : पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याला मुलांच्या आरोग्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सने  हिरवा कंदील दिला आहे. आरोग्य विभागानेही त्यास मान्यता दिली. आता शाळा कधी सुरू करायच्या याचा अंतिम निर्णय आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुले आजारी पडण्याचे प्रमाण जास्त नाही. रोज 700 ते 800 नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यात मुलांची संख्या नाममात्र असल्याने पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून टोपे म्हणाले की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ द्यायला हवे, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे.

आरोग्याबरोबरच मुलांच्या मनोवस्थेचाही विचार व्हायला हवा, अशी सूचना टास्क फोर्सने केली आहे. आरोग्याचे सर्व नियम पाळून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करायला परवानगी देण्याची टास्क फोर्सची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवली आहे.

12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले पाहिजे, यावर टास्क फोर्स आग्रही आहे. ही बाब केंद्र सरकारलाही कळविण्यात आली आहे. केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर या वयोगटाच्या मुलांचेही लसीकरण सुरू केले जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.