Taskforce Meet : सुविधा आहेत पण ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घ्या; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली आहे, असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (रविवारी, दि.05) उद्घाटन झाले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठी? तर कारण स्पष्ट आहे. जगात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटू आहे, आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून ही परिषद त्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

‘तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत, तर डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत, त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपणही सज्ज राहण्याची आवश्यकता’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.