Mumbai News : नवी मुंबईत टाटांची 5,000 कोटींची गुंतवणूक, 70 हजार जणांना मिळणार रोजगार

एमपीसी न्यूज – टाटा रिॲलिटी ‘इंटेलियन’ आयटी पार्कची नवी मुंबईत उभारणी करीत आहे. यासाठी तब्बल 5,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार असून, सुमारे 70 हजार जणांना यामुळे रोजगार उपलब्ध होईल. या आयटी पार्कचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि‌.18) भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय दत्त, अशोक सुभेदार, ॲक्टिस इंडियाचे भागिदार आशिष सिंग, बिझनेस हेड अभिजीत माहेश्वरी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे आखली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयटी, आयटीएस धोरणामुळे राज्यात सर्वाधिक डेटा सेंटर्स सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण एैंशी टक्क्यांवर जाईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. राज्यात गुंतवणुकीला ओघ वाढत आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही इतर राज्यात जात नाही, आम्ही दुबई, युरोप सारख्या देशांत जातो. कोरोना काळात आम्ही सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आकर्षित केली, असे देसाई म्हणाले.

असे असेल इंटेलियन पार्क

नवी मुंबईत सुमारे 47 एकर क्षेत्रावर इंटेलियन पार्क उभारले जाणार आहे. या ठिकाणी आयटी, व्यापारी केंद्र, डेटा सेंटर विकास केंद्र असेल. नवी मुंबईतील घणसोली स्टेशनसमोर हे इंटेलियन पार्क असेल. सुमारे 47.1 एकर व सत्तर हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर हे पार्क असेल. यामुळे नवी मुंबई परिसराचा कायापालट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.