TATA IPL 2022: धोनीच्या करामतीमुळे चेन्नईचा शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय, मुंबईच्या नैराश्यात भर

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात आपल्या कीर्तीला जागत केलेल्या खेळामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखत रोमहर्षक विजय मिळवला. पराभवांची मालिका अखंड राहिल्याने मुंबई इंडियन्स संघ मात्र निराशेच्या खोल गर्तेत ढकलला गेला आहे. 

अतिशय थरारक अशा कालच्या (गुरुवार) सामन्यात मुंबई संघ विजयाच्या अगदी जवळ आलेला असताना सहा चेंडूत 17 धावा रोखणे जयदेव उनाडकटला जमले नाही आणि त्याच्या याच दडपणाच्या मनस्थितीचा अनुभवी महेंद्रसिंग धोनीने अप्रतिम फायदा उचलत एक अशक्यप्राय विजय शक्य करून दाखवताना जगभरातले क्रिकेट अभ्यासक धोनीला सर्वोत्कृष्ट फिनिशर का म्हणतात, याचे पुन्हा एकदा उदाहरण पेश करत मुंबई संघाला निराशेच्या खोल गर्तेतही ढकलले.

सुरुवातीच्या षटकात रोहीत आणि किशनला बाद करुन चेन्नई संघासाठी जोरदार सुरूवात करुन देणाऱ्या डावखुऱ्या जलदगती गोलंदाज मुकेश चौधरीला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

आयपीएलचे चाहते आहेत, त्या सर्वांना आजकाल एकच प्रश्न छळतो आहे तो म्हणजे, मुंबई इंडियन्सला नक्की झालंय तरी काय? सर्वाधिक म्हणजे पाच वेळा आयपीएलचा कप उंचावलेल्या मुंबई इंडियन्सला यावर्षीच्या हंगामात आजच्या सामान्यांपर्यंत तरी एकही विजय मिळवता आला नव्हता, आजही त्यात काहीही बदल झाला नाही. दुःखात सुख इतकंच की मुंबईने आज जोरदार लढत दिली, एक वेळ ते हा सामना जिंकतील, असं वाटत असतानाच धोनीच्या कमालीमुळे मुंबई संघाला जिंकता जिंकता हार पत्करावी लागली.

नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने लागताच जडेजाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत मुंबईला  प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. नाणेफेकीच्या वेळी तरी रोहितची देहबोली सकारात्मक वाटत होती. त्यावेळी वाटले आज तरी त्याची बॅट परजेल, पण कसले काय? रोहीतची बॅट मागील कित्येक सामन्यांपासून थंड झालेली आहे, आजही तिने रोहित आणि त्याच्या असंख्य चाहत्यांना निराशच केले.

डावखुरा मुकेश चौधरी त्यासाठी कारणीभूत ठरला. स्वप्नवत सुरुवात करताना त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित आणि ईशानला तंबूत परतवून मुंबई इंडियन्सच्या गोटात एकच खळबळ माजवली. या दोघांनाही भोपळा सुध्दा फोडता आला नाही. ईशान किशन हा आयपीएलमधला महागडा खेळाडू म्हणूनच चर्चिला जावा याहून अधिक दुसरा दैवदुर्विलास कुठला? त्याचीही बॅट सध्या बोलत नाही.

या आयपीएलने अनेक नवोदितांना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे,पण या आयपीएलमधल्या अपयशी कामगिरीने त्यांच्या करीयरमध्ये बाधा येवू नये, इतकेही अपयश त्यांच्या वाट्याला येवू नये, इतकीच कळकळ एक कट्टर क्रिकेटरसिक म्हणून वाटते.

या मोठ्या धक्क्याने मुंबई कशी सावरेल, असे वाटत असतानाच युवा ब्रेवीसनेही अपेक्षाभंग केला. त्याचाही खेळ मुकेशनेच खल्लास करत मुंबई इंडियन्सचे कंबरडे मोडले. आता सर्व अपेक्षा मुंबई संघाचा या वर्षीचा एकमेव तारणहार सूर्यकुमार यादववरच होत्या, मात्र तो सूर्यही आज फारसा तळपला नाही. हा त्याने अंधाराला दूर करण्यासाठी थोडीफार आपले तेजस्वी किरणे सोडली, पण त्यालाही सॅटनरने वैयक्तिक 32 धावांवर बाद करून मुंबईची अवस्था चार बाद 47 अशी केली. ज्यात सूर्यकुमारच्या 32 धावा होत्या.

पदार्पण करणाऱ्या शौकीनने या पडझडीतही आपला दर्जा दाखवला पण तो ही फक्त 25 धावाच करु शकला. त्याला ब्रावोने बाद केले आणि मुंबई संघ पुरता अडचणीत आला. यावेळी किमान पूर्ण 20 षटके तरी मुंबई इंडियन्स खेळतील का, प्रश्न भेडसावू लागला होता. या कठीण परिस्थितीत खेळपट्टीवर उभे होते ते पोलार्ड आणि नवोदित तिलक वर्मा.

मात्र पोलार्डनेही फक्त 14 च धावा केल्या आणि तोही तंबूत परतल्यावर त्याच्या पावलावर पाऊल टाकत डॅनियल सॅम्सनेही तंबूची वाट धरल्यानंतर मात्र तिलक वर्माने जबरदस्त खेळ करत आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले आणि उनाडकटला सोबत घेऊन संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला.

तिलक वर्माने 43चेंडूत नाबाद 51 धावा काढत त्याचा दम दाखवला तर जयदेव उनाडकटनेही आपली बॅट परजवत 9 चेंडूत नाबाद 19 धावा काढल्या. त्यामुळे खराब सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सच्या नावावर वीस षटकानंतर 7 गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा लागल्या. चेन्नई संघासाठी मुकेश चौधरीने सर्वाधिक तीन तर ब्रावोने दोन गडी बाद केले.

या छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचीही सुरुवात खराबच झाली. मागच्याच सामन्यात फॉर्म सापडलाय असे वाटणाऱ्या ऋतुराजने आज पुन्हा एकदा निराश केले. आज त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्याला सॅम्सने बाद केले तर सॅटनरलाही सॅम्सनेच वापस पाठवून चेन्नईची अवस्था दोन बाद 16 अशी केली आणि हा सामना मुंबई संघ सहजासहजी चेन्नईला जिंकू देणार नाही, असे वाटायला लागले.

यानंतर मात्र अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा या अनुभवी जोडीने डाव सावरायला सुरुवात केली. दोघेही परिस्थितीचा अंदाज घेत खेळत होते आणि खराब चेंडूचा योग्य समाचारही घेत होते. बरोबर 50 धावांची भागीदारी झाल्यानंतर रॉबिनला उनाडकटने वैयक्तिक 30 धावांवर बाद करून चेन्नईला तिसरा धक्का दिला आणि मुंबईसाठी डोकेदुखी वाढवत असलेली ही भागीदारीही तोडली.

त्याच्या जागी आलेला शिवम दुबे त्याचा चांगला असलेल्या फॉर्मचा आज तरी फारसा फायदा उठवू शकला नाही आणि स्वस्तात बाद होवून तंबूत परतला. पाठोपाठ थोड्याफार फरकाने अंबाती रायडू आणि कर्णधार जडेजा सुद्धा बाद झाले आणि मुंबई संघ सामन्यात परत येतोय असे वाटत होते, चेन्नई संघासाठी शेवटची आस होती ती म्हणजे माही. त्याला साथ द्यायला दुसऱ्या बाजूने होता प्रिटोरियस.

शेवटच्या तीन षटकात चेन्नईला विजयासाठी 42 धावा तर मुंबईला विजयासाठी चार गडी बद करायचे होते. षटकामागे 14 धावा टी-20त फार मुश्कील नक्कीच वाटत नाहीत, तरीही मुंबई संघाला विजयासाठी या वेळी तरी जास्त संधी असल्याचे वाटत होते. त्यातच उनाडकटने 18 व्या षटकात एक षटकार आणि एक चौकार खात 14 धावा दिल्या आणि दोन षटकात 28 धावा असे समीकरण आले.

19 वे षटक नेहमीच टी-20 त महत्वपूर्ण ठरते आणि ते घेवून तयार होता मुंबईसाठी जसप्रीत बुमराह. आपली सर्व ताकत आणि अनुभव पणाला लावत जस्सीने 19 व्या षटकात 11 धावा दिल्या, त्यातला एक चौकार सॅम्सच्या ढिलाईनेच मिळाला. सामना एकदम रोमांचक आणि थरारक स्थितीत आला होता.

शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावा हव्या होत्या ज्या रोखण्याची जबाबदारी होती उनाडकटवर. त्याने पहिल्याच चेंडूवर खतरनाक खेळत असलेल्या प्रिटोरियसला पायचीत केले आणि मुंबईच्या विजयातला मोठा अडथळा दूर केला. दुसऱ्या चेंडूवर ब्रावोने एक धाव घेवून माहीला स्ट्राईक दिला आणि तिसऱ्या चेंडूवर धोनीने फ्लॅट सिक्स मारत सामना पुन्हा रंगतदार केला.

तीन चेंडू दहा धावा आणि समोर धोनी मार रहा है, या मूडमध्ये. चौथ्या चेंडूला आला पुन्हा एक चौकार. मग दोन चेंडूत सहा धावा. पाचव्या चेंडूवर दोन धावा माहीने पळून काढल्या आणि शेवटच्या चेंडूला मिडविकेटच्या दिशेला भिरकावून माहीने आपल्या संघाला दुसरा विजय मिळवून दिला. मुंबई संघाला सातवा पराभव चाखवत सहा चेंडूत 17 धावा काढत माहीने आजही आपला दम तोच आहे, याची सुखद प्रचीती देत आपल्या चाहत्यांना प्रचंड आनंद दिला.

या पराभवाने मुंबई संघाच्या दुःखावर मीठ चोळले, आणि त्यांना या स्पर्धेत तरी आता पुढील आव्हान प्रचंड खडतर असेल ही जाणीवही करुन दिली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई 20 षटकात 7 बाद 155
सूर्यकुमार 32, तिलक वर्मा नाबाद 51, उनाडकट नाबाद 19, पोलार्ड 14
मुकेश चौधरी 19/3, ब्रावो 36 /2, सॅटनर 16/1

पराभूत विरुद्ध

चेन्नई सुपर किंग्ज सात बाद 156
उथप्पा 28,रायडू 40 धोनी नाबाद 28,प्रिटोरियस 22
सॅम्स 30/4, उनाडकट 48/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.