TATA IPL 2022: चौथ्या विजयासह आठ गुण मिळवून गुजरात संघ प्रथम क्रमांकावर

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – टाटा आयपीएल 2022 मधील कालच्या 24 व्या सामन्यात गुजरात टायटनने राजस्थान रॉयल संघाचा 37 धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेत आपले नवखेपण कुठेही जाणवू न देता विजयी वारू चौखूर उधळून सर्वाना प्रभावीत केले. अष्टपैलू कामगिरी करणारा गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या सामन्याचा मानकरी ठरला.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय संजू आणि त्याच्या संघाच्या चांगलाच अंगलट आला. हार्दिक पंड्याने केलेल्या लागोपाठ दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन संघाने आपल्या 20 षटकात 4 गडी गमावून 192 धावा जमा करून राजस्थान संघापूढे मोठेच आव्हान उभे केले.

खरे तर गुजरात संघाची सुरुवात खूप खराब झाली, वेड आणि गील दोघेही स्वस्तात बाद झाले आणि त्यानंतर थोड्याच वेळात विजय शंकर सुद्धा फक्त 2 धावा करून बाद झाला आणि गुजरात संघ 7 व्या षटकात 3 बाद 53 अशा बिकट परिस्थितीत सापडला, पण यावेळी संघाच्या मदतीला धावून आला तो कर्णधार हार्दिक पंड्या आणि त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली त्या नवोदित अभिनव मनोहरने.

काही खेळाडू असे असतात की, त्यांना आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडली की, त्यांचा खेळ आणखी सुंदर होतो. ते जबाबदारीला सार्थ न्याय देतात. हार्दिक पण यातलाच एक! मुंबई इंडियन्सने त्याला वगळल्यानंतर, दुखापतीमुळे राष्ट्रीय संघातले स्थान गेल्यानंतर त्याला यावर्षीच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन संघाने खरेदी केले. एवढेच नव्हे तर त्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारीही दिली. त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि त्याचा रिझल्ट बघा.

नवोदित संघ म्हणून बघितल्या जाणाऱ्या गुजरात टायटन संघाने आपल्या पहिल्या तीनही सामन्यात विजय मिळवून सर्वानाच प्रभावीत केले. याचसोबत पंड्याची वैयक्तिक कामगिरीही जबरदस्त होत आहे. आजही त्याने अप्रतिम फलंदाजी करताना या स्पर्धेतले आपले लागोपाठ दुसरे अर्धशतक तर पूर्ण केलेच, पण त्याचसोबत सर्वधिक धांवा करून पर्पल कॅप ही पटकावली.

त्याचसोबत त्याची गोलंदाजीही चांगली होत आहे, ही फक्त आयपीएलसाठी नव्हे तर भारतीय संघासाठीही खूप मोठी बातमी आहे. आज त्याने अभिनव मनोहर सोबत 86 धावांची चांगली भागीदारी करताना डाव तर सावरलाच, पण आक्रमक खेळत धावसंख्याही हालती ठेवली. त्याच्या या खेळामुळे अभिनवचाही आत्मविश्वास चांगलाच बळावला आणि त्याने एक अतिशय उपयुक्त आणि आक्रमक खेळी करत संघा साठी चांगले योगदानही दिले.

अभिनवने फक्त 28 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकार मारत 43 धावा केल्या. तो आज आपले पहिले अर्धंशतक पूर्ण करेल, असे वाटत असतानाच तो चहलच्या गोलंदाजीवर 16 व्या षटकात बाद झाला, पण यानंतर हार्दिकने जबरदस्त खेळ करत संघाला 190 च्या पुढे नेऊन ठेवले. त्याला डेविड मिलरचीही चांगली साथ मिळाली.

हार्दिकने 57 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकार मारत नाबाद 87 तर मिलरने 14  चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. यामुळेच गुजरात संघाची धावसंख्या 5 बाद 192 अशी आव्हानात्मक झाली. राजस्थान संघासाठी रियान पराग, कुलदीप सेन आणि चहलने प्रत्येकी एकेक बळी मिळवला, पण त्यातला एकही गुजरात संघावर असलेल्या दडपणाचा विशेष फायदा उठवू शकला नाही.

उत्तरादाखल खेळताना राजस्थान संघाचीही सुरुवात खराबच झाली. पडीकल आजही विशेष योगदान देवू शकला नाही आणि पहिलाच सामना खेळत असलेल्या युवा डावरा मध्यमगती गोलंदाज यश दयालला त्याच्या पहिल्याच षटकात आपली विकेट देऊन तंबूत परतला. तो बाद झाला आणि संजू सॅमसनने अनाकलनीय निर्णय घेत चक्क रवी अश्विनला तिसऱ्या नंबरवर पाठवले, पण अश्विन या निर्णयाला सार्थ ठरवू शकला नाही, आणि फक्त 8 धावा काढून फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

या पडझडीतही पहिल्या सामन्यापासूनच फॉर्मात असणारा जोस बटलर आपले आणखी एक अर्धशतक पूर्ण करून टिकून खेळत होता. तो आणखी एक मोठी खेळी करून पर्पल कॅप सोबतच संघासाठी भारदस्त कामगिरी करेल असे वाटत असतानाच 54 धावा काढून फर्ग्युसनची दुसरी शिकार ठरला. बटलर आतापर्यंत सर्वाधिक 272 धावा काढून पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याच्या 54 धावा फक्त 24 चेंडूत आल्या, ज्यात 8 चौकार आणि तीन षटकार सामील होते.

त्याच्या पाठोपाठ संजूही धावबाद झाला आणि राजस्थान संघ चांगलाच अडचणीत आला. ज्यामुळे नंतर येणाऱ्या फलंदाजांवर दडपण वाढत गेले. त्यात हव्या त्या धावगतीने धावा निघाल्या नाहीत. परिणाम राजस्थान रॉयल संघाला 37 धावांची मात देत पंड्याच्या गुजरात टायटनने आपल्या चौथ्या विजयासह अंकतालिकेत प्रथम क्रमांकही मिळवला.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन – 20 षटकात 4 बाद 192
पंड्या नाबाद 87, मिलर नाबाद 31, मनोहर 43
पराग 12/1, चहल 32/1, कुलदीप 51/1

विजयी विरुद्ध

राजस्थान रॉयल – 9 बाद 155
बटलर 54, सॅमसन 11, रियान 18, हेटमायर 29, निशाम 17
यश दयाल 40/3, फर्ग्युसन 23/3, पंड्या 18/1, शमी 39/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.