Tata Motors : टाटा मोटर्स आणि कुस्ती महासंघाची मजबूत भागीदारी ; ‘क्वेस्ट फॉर गोल्ड अ‍ॅट पॅरिस ऑलिम्पिक’ विकास कार्यक्रम लॉन्च

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स आणि भारतीय कुस्ती महासंघात यापूर्वीची भागीदारी आणखी मजबूत झाली आहे. 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सूवर्ण पदक मिळवायचे या उद्देशाने ‘क्वेस्ट फॉर गोल्ड अ‍ॅट पॅरिस ऑलिम्पिक 2024’ हा समग्र विकास कार्यक्रम लॉन्च करण्यात आला आहे.

यावेळी ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता रवीकुमार दहिया, कांस्य पदक विजेता बजरंग पुनिया यांच्यासह अंशु मलिक, सोनम मलिक, सीमा बिस्ला, दीपक पुनिया आणि विनेश फोगाट उपस्थित होते. यावेळी टाटा योद्धा पिक-अप भेट देण्यात आली.

या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय कुस्ती महासंघ टाटा मोटर्सच्या सहकार्याने पायाभूत सुविधा, योग्य व्यासपीठ, संधी आणि सुरक्षा याच्यासह, पैलवानांच्या वाढ, प्रगती आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणार आहे. सर्व वयोगटातील पुरुष आणि महिला दोन्हींसाठी हा उपक्रम असेल. तरुण आणि प्रतिभावान भारतीय कुस्तीपट्टूंना, ‘योद्धा’ समृद्ध पोषण कार्यक्रमाद्वारे जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रशिक्षक आणि सहाय्य मिळणार आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, पात्र वरिष्ठ कुस्तीपटूंना केंद्रीय करार दिले जातील, नवोदित कुस्तीपटूंना विमा संरक्षण, वैद्यकीय आणि फिजिओथेरपी आणि शिष्यवृत्ती दिली जाईल.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, 2018 पासून टाटा मोटर्सच्या पाठिंब्यामुळे भारतीय कुस्तीला अधिक उंचीवर नेण्यास मदत झाली आहे. गेल्या 3 वर्षांत, आमच्या योद्ध्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 40-50 पेक्षा जास्त पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये वरिष्ठ वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 5 पदके आहेत-भारतासाठी आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. नुकत्याच पार पडलेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 11 पदके आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2 पदकांची कमाई केली आहे. असे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.

यावेळी बोलताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, ‘कुस्ती हा खेळ संपूर्ण भारतात खोलवर रुजलेला आहे आणि जागतिक क्षेत्रात यशाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा खेळ आक्रमकता, सहनशक्ती, गती, चपळता आणि शक्तीची चाचणी घेते. कुस्ती महासंघासोबत आम्ही राष्ट्राच्या समृद्ध कुस्ती प्रतिभेला प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देत राहू. टाटा मोटर्समध्ये, आम्ही क्रीडा आणि क्रीडापटूंना समर्थन देण्यावर विश्वास ठेवतो जे आपल्या देशाला क्षमता, आवेश आणि उत्कटतेने पुढे नेतील. असे गिरीश वाघ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.