Tata motors : टाटा मोटर्सच्या कार प्लान्टने पटकाविली सर्वाधिक सुवर्णपदके, स्पर्धेला कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

एमपीसी न्यूज – क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने (Tata motors) भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे दोन दिवसीय 38 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टर आजवरच्या इतिहासात यावेळी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.
या दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातील 81 कंपन्यांमधील 331 संघातून 1480 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत 283 केसस्टडी, 19 स्लोगन व 29 पोस्टर्स सादर करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदके टाटा मोटर्स कंपनीने पटकाविले आहेत.
स्पर्धेत टाटा मोटर्स, कार प्लान्ट, जेसीबी इंडिया, किर्लोस्कर मिंडा, थरमॅक्स, लुमॅक्स, एक्साइड, इंडस्टीज कॉमिन्स, बडवे, टाटा ऑटो कॉम्प, समुह कंपन्या, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड थिसेनक्रुप, एल.अॅन्ड टी. डिफेन्स आदी कंपन्यांनी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभाग नोंदविला आहे.
राष्ट्रीय अधिवेशनाचे पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन टाटा (Tata Motors) मोटर्स कंपनीतील कार प्लान्टचे विभाग प्रमुख श्यामसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी थिसेनक्रुपचे ऑपरेशन विभागाचे संचालक अभय घिरणकर, संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरचे प्राचार्य डॉ.एम.ए. व्यंकटेश, फोरमचे कौन्सिल सदस्य व अॅक्युरेट इंजिनिअरिंगचे विक्रम साळुंखे उपस्थित होते.
विविध कंपनीतील विजेत्या स्पर्धकांना टाटा मोटर्सचे श्याम सिंग, जेसीबी इंडिया प्लान्ट कंपनीचे अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिके, पदक, स्मृतीचिन्ह स्वरूपात प्रदान करण्यात आले.
अधिवेशनाचे दुसर्या दिवशी स्पर्धेचे उद्घाटन सी.आय.ई. इंडिया कंपनीचे राहुल राजे, एम.आय.टी. पुणे येथील असोसिएट्स डीन डॉ.स्वाती बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना जेसीबी इंडिया प्लान्टचे संजीव सोनी यांच्या हस्ते पदके व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या अधिवेशनातील मान्यवरांचे सत्कार क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे यांनी केले. स्वागत पुणे चॅप्टर फोरमच्या अध्यक्षा डॉ.रजनी इंदुलकर यांनी केले.
या अधिवेशनाचे सूत्रसंचालन फोरमच्या विजया रूमाले यांनी तर, आभार संजीव शिंदे यांनी मानले. स्पर्धेचे नियोजन चंद्रशेखर रूमाले व प्रशांत बोराटे यांनी केले.