Tata Motors : ‘व्हील्स ऑफ लव्ह’ टाटा मोटर्सचा पालकत्वाला पाठबळ देणारा सर्वांगीण कार्यक्रम

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने आज ‘व्हील्स ऑफ लव्ह’ या सर्वांगीण कार्यक्रमाची घोषणा केली. नव्याने मातापिता झालेल्या व होणार असलेल्या कंपनी कर्मचाऱ्यांसाठी प्रगत व संवेदनशील संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

नव्याने पालक झालेल्या किंवा होणार असलेल्यांना त्यांच्या कुटुंबासह, करिअरमधील उद्दिष्टेही पूर्ण करणे या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. यासाठी उपयुक्‍त ठरेल अशी तत्त्वे मांडणारे ‘व्हील्स ऑफ लव्ह’ या नावाचे पुस्तकही तयार केले आहे. पालकांना मार्गदर्शन करण्यासोबतच, व्यवस्थापकांनी पालकत्वाच्या विविध टप्प्यांमधून जाणाऱ्या त्यांच्या टीममधील सदस्यांना कशी मदत करावी याबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे.

टाटा मोटर्सचे मनुष्यबळ विकास अधिकारी रवींद्र कुमार ‘व्हील्स ऑफ लव्ह’ची घोषणा करताना म्हणाले, ‘टाटा मोटर्समध्ये आम्ही यशाकडे घेऊन जाणारी धोरणं आणि समावेशकतेचा स्वीकार केला आहे. स्त्री-पुरुष सर्वांना सामावून घेणारे (जेंडर डायव्हर्स) कार्यस्थळ विकसित करण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. हे कार्यस्थळ संवेदनशील आणि समावेशकही आहे.

आयुष्य आणि करिअरच्या विविध टप्प्यांत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या विचारवर ही संस्कृती आधारलेली आहे. नव्यानं होऊ घातलेल्या पालकांसाठी नातेसंबंध, प्रेम आणि मदतीचे एकात्मिक नेटवर्क तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

‘व्हील्स ऑफ लव्ह’ कार्यक्रमात अंतर्भूत असलेल्या महत्वाच्या गोष्टी

– कामाच्या ठिकाणी गरोदरपणाची माहिती देणे, व्यवस्थापकांपुढील पेच समजून घेणे, वर्क डिलिव्हरेबल्सचे (जे काम करून देणे अपेक्षित आहे ते) प्रभावी व्यवस्थापन, कामाचे हस्तांतर, मातृत्व रजेचे व्यवस्थापन आणि कामावर पुन्हा रुजू होतानाचे स्थित्यंतर

– मातृत्वाच्या विविध टप्प्यांतून वाट काढण्यात मदत करण्यासाठी मदर अँड मॅनेजर गाइड्स.

– नवीन पालकांना जाणवणाऱ्या भावनिक व मानसिक आव्हानांचा सामना करण्यासाठी डेडिकेटेड समुपदेशन सत्रे.

– गरोदर स्त्रिया/नवमाता आणि त्यांच्या व्यवस्थापकांसाठी कामातील स्थित्यंतरांचे व्यवस्थापन करण्यासाठी वन-टू-वन कोचिंग सत्रे.

– नवमातांना त्यांच्या बाळंतपणाच्या रजेदरम्यान कामाच्या ठिकाणाशी संपर्क कायम ठेवण्यासाठी एक बडी नियुक्‍ती करून देणे

– एम्प्लॉयी रिसोर्स गृप्स हा नवीन पालकांसाठी एक विशेष समुदाय आहे. यामध्ये अनुभवाचे आदान प्रदान करता येईल.

– विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे वेबिनार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.