Tathavade Crime News : येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या रावण टोळीच्या सदस्याला पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक

एमपीसी न्यूज – येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या रावण टोळीच्या सदस्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्याप्रकरणी ताथवडेमधून अटक केली.

अश्रुकांत ऊर्फ अशोक उत्तरेश्वर कसबे (वय 23, रा. जीवननगर, ताथवडे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक विजय तेलेवार यांना माहिती मिळाली की, रावण टोळीचा सदस्य अश्रूकांत कसबे याच्याकडे विनापरवाना पिस्टल आहे.

तो येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर बाहेर आला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताथवडे, मयूर लॉजजवळून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी 40 हजार 500 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करत त्याला अटक केली.

त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अश्रूकांत याच्या विरोधात यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक आणि देहूरोड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई गुंडा विरोधी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहिते, प्रमोद गर्जे, शुभम कदम यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.