Tauktae Cyclone Effect: वाकड, हिंजवडी भागात दोन तास बत्ती गुल; ग्रामीण भागातील 245 गावांचा वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे शनिवारी (दि.15) रात्रीपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. गेल्या 48 तासांत वाकड, हिंजवडी, चऱ्होली, ताथवडे, किवळे या परिसरात वीजवाहिन्यांवर मोठी झाडे तसेच मोठमोठी फ्लेक्स पडल्यामुळे दीड ते दोन तासांसाठी वीजपुरवठा खंडित राहिला. तसेच, ग्रामीण भागात वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला असून 245 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता तर त्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद ठेवावा लागला होता.

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 48 तासांमध्ये वाकड, हिंजवडी, चऱ्होली, ताथवडे, किवळे या परिसरात वीजवाहिन्यांवर मोठी झाडे तसेच मोठमोठी फ्लेक्स पडल्यामुळे दीड ते दोन तासांसाठी वीजपुरवठा खंडित राहिला. मात्र, शहराच्या उर्वरित सर्व भागामध्ये वीजपुरवठा सुरळीत होता.

पुणे परिमंडल अंतर्गत वेल्हे, मुळशी, कामशेत, खानापूर, पानशेत, मावळ, लोणवळा, खंडाळा, कार्ला, जुन्नर आदी ग्रामीण भागांमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. वादळी पावसासोबतच वीजवाहिन्यांवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने रविवारी (दि. 16) सुमारे 245 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता तर त्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद ठेवावा लागला होता.

त्यामुळे सुमारे 1 लाख 36 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत 179 गावांमधील 1 लाख 4 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला तर, उर्वरित 66 गावे ही डोंगराळ व अतिदुर्गम असल्याने तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सोमवारी सायंकाळपर्यंत सुरु होते.

त्याआधी दुपारनंतर चक्रीवादळाचे स्वरुप अतीतीव्र झाल्याने वादळाचा वेग पुन्हा वाढला होता. परिणामी लोणावळा, खंडाळा, कार्ला, मुळशी, पानशेत, खानापूर आदी भागात जोरदार वारे वाहत होते. अशा अत्यंत नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत देखील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु होते, असे महावितरणने म्हटले आहे.

पुणे शहरातील सर्व वीजपुरवठा सुरळीत होता. तथापि कोंढवा, काकडेवस्ती, टिळेकरनगर, भिलारेवस्ती, गंगा व्हिलेज, उंद्री, पिसोळी, केशवनगर, मुंढवा आदी भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले. मात्र दीड तासांपर्यंत या सर्व भागातील वीजपुरवठा हा ताबडतोब दुरुस्ती व पर्यायी व्यवस्थेमधून सुरळीत करण्यात आला असे, महावितरणने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.