Chakan : तो शिक्षक व मुख्याध्यापक गजाआड 

मेदनकरवाडी प्राथमिक शाळा अश्लील चाळे प्रकरण 

एमपीसी न्यूज – शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना चाकण जवळील मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उघडकीस आल्यानंतर इयत्ता सातवीत शिकणाऱ्या सहा विद्यार्थीनींशी अश्लील चाळे व छेडछाड केल्याप्रकरणी विकृत शिक्षक तसेच संबंधित शिक्षकाच्या गैरकृत्यांची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकाला चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.५) बेड्या ठोकल्या आहेत. तर संबंधीत शिक्षक, शाळेचा मुख्याध्यापक आणि गुन्हा दाखल झालेल्या दोन शिक्षिकांना पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील अल्पवयीन मुलींच्या छळाचा हा प्रकार सुरु होता. केंद्रप्रमुख विश्वास सोनवणे यांनी गुरुवारी (दि.४) रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक बालाजी लिंबाजी डोंबे, मुख्याध्यापक नितीन दतात्रेय जाधव व याच शाळेतील दोन शिक्षिकांवर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी चाकण पोलीस ठाण्यात येऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी डोंबे हा शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून संबंधित लहान मुलींशी अश्लील चाळे करायचा. त्यांच्याशी असभ्य वागायचा. तसेच त्यांच्या शरीराला स्पर्श करायचा. त्यांचे फोटो काढून तुमच्या आई वडिलांना सांगेल, अशा पद्धतीने त्यांना धमकावयाचा व फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेल करायचा. दहशतीमुळे व भीतीमुळे संबंधित मुली गुपचूप हा प्रकार सहन करत होत्या. दरम्यान, नांदी फाऊंडेशनच्या स्वयंसेविकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक नितीन जाधव यांना सर्व हकीकत सांगितली. परंतु मुख्याध्यापक जाधव यांनी याकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्षच करण्याचे काम केले. शिक्षक बालाजी डोंबे व मुख्याध्यापक नितीन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. 
 
पीडित विद्यार्थीनींची विचारपूस :
खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विस्तार अधिकारी जयश्री दोंदे, केंद्रप्रमुख विश्वास सोनवणे यांनी शाळेत जाऊन पीडित मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी मुलींनी संबंधित शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. याची कल्पना शाळेतील शिक्षिका सुलोचना कातोरे व प्रधान यांना देखील होती, असे सांगितले.  
 
चारही शिक्षक निलंबित: 
 शाळेतील लहान मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या बालाजी डोंबे या शिक्षकासह त्याच्या गैरकृत्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणारे शाळेचे मुख्याध्यापक नितीन जाधव, शिक्षिका सुलोचना कातोरे व प्रधान या चार शिक्षकांना पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या सेवेतून तात्काळ निलंबित केल्याची माहिती, खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार यांनी दिली आहे. अवघ्या बारा तासांत चारही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.