Pune : शिक्षक दिनी मिळाली मुख्याध्यापक पदाची भेट

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या शाळांतील 66 शिक्षकांना शिक्षक दिनी मुख्याध्यापक पदाची अनोखी भेट मिळाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या विशेष प्रयत्नातून शिक्षकांना हा अनोखा आनंद मिळू शकला. महापौर मुक्ता टिळक यांनी  नवनियुक्त मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या.

महापालिका शाळांतील मुख्याध्यापकाच्या 66 जागा रिक्त होत्या. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या 51 आणि उर्दू माध्यमाच्या 15 जागांचा समावेश होता. 1999 मध्ये समाविष्ट गावातील शिक्षकांना बढती देण्यात आली. मात्र मूळ आस्थापनेवरील शिक्षकांची सेवाज्येष्ठता प्राधान्याने धरली जात नव्हती. त्यामुळे या जागा रिक्त होत्या.

मुख्याध्यापकांची रिक्त पदे सेवाज्येष्ठता ग्राह्य धरुन तातडीने भरावीत अशी मागणी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या कडे काही दिवसांपूर्वी केली होती. प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकि‘या पूर्ण केल्या. आज या शिक्षकांना अधिकृत आदेश देण्यात आला.

महापालिका शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी गेल्या काही वर्षांमध्ये सुधारली आहे. दहावीच्या परीक्षेत आणि पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढण्यास निश्‍चित उपयोग होईल, असा विश्‍वास महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या जागा रिक्त होत्या. विद्यादानाचे काम महापालिकेतील शिक्षक मनोभावे करीत आहेत. काही ना काही कारणांनी रिक्त पदे भरली जात नव्हती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बढतीची प्रकि‘या आज शिक्षक दिनी पूर्ण करता आली. शिक्षक दिनी मुख्याध्यापक होण्याचा योग तब्बल ६६ शिक्षकांना मिळाला याचा विशेष आनंद होत असल्याचे मत सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शहरात 287 शाळा आहेत. त्यापैकी काही शाळा एकाच इमारतीमध्ये आहेत. महापालिकेच्या या शाळांसाठी मुख्याध्यापकांच्या 175 जागा आहेत. त्यातील 108 जागांवर मुख्याध्यापक होते. उर्वरीत 66 पदांचा भार या मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आला होता. काही मुख्याध्यापकांना तीन ते चार शाळांही देण्यात आल्या होत्या. त्याचा परिणाम शाळांच्या व्यवस्थापनावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर होत होता. त्यामुळे मुख्याध्यापकांची पदोन्नती करण्याची मागणी करण्यात येत होती.

शिक्षकांना पदोन्नती मिळावी यासाठी पुणे महापालिका पदवीधर शिक्षक संघटनेने विशेष प्रयत्न केले. संघटनेचे अध्यक्ष मनोहर बाबर, सरचिटणीस विकास काटे, सचिन वाडकर, मनिषा शिंदे, नामदेव जगताप या पदाधिकार्‍यांनी शिक्षकांसमवेत श्रीनाथ भिमाले यांचे विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.