Dehugaon News : शीलसंपन्न विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर – हभप पांडुरंग महाराज घुले

एमपीसी न्यूज – ज्ञानाचा अभाव आपण भरून काढू शकतो. पण चारित्र्याचा अभाव कधीही भरून काढता येत नाही. म्हणूनच शील संपन्न विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. सूर्याच्या प्रकाशमानतेचा दाखला देत आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते इतरांना द्यावे, असे मत श्रीक्षेत्र देहू येथील गाथा मंदिराचे मुख्य प्रवर्तक, गुरुवर्य, हभप पांडुरंग महाराज घुले यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मीडियम स्कूलने आयोजित केलेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते

श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मीडियम स्कूलने आयोजित केलेल्या शिक्षक गुणगौरव सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना घुले महाराजांनी मंत्र नाही असे एकही अक्षर नाही, औषध नाही अशी एकही झाडाची मुळी नाही, अयोग्य असेल असा एकही पुरुष नाही, फक्त याची योजना करणारा भेटला पाहिजे असे मत व्यक्त करीत विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांचे कौतुक करीत भविष्यात या शाळेतून अनेक सुसंस्कृत विद्यार्थी घडतील असा आशीर्वाद याप्रसंगी दिला.

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या अभंगांप्रमाणे अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून अभंग असे कार्य कंद परिवाराकडून भविष्यात घडेल अशी आशा घुले महाराज यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहर दै. लोकमतचे मुख्य उपसंपादक डॉ. विश्वास मोरे  व मावळ तालुक्यातील इंदोरी गावच्या भूषण डॉ.कल्पना काशीद यांचा पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने  घुले महाराजांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. डॉ कल्पना काशीद यांनी अभंग स्कूलच्या या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाले अशी आपुलकी दाखवित या सन्मानाचा स्वीकार केला तसेच डॉ. विश्वास मोरे  यांनी आपण आजही विद्यार्थी आहोत आणि हा सन्मान स्वीकारताना मी विद्यार्थी म्हणूनच आलो आहे असे मत व्यक्त करीत या सन्मानाचा स्वीकार केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकगीत सादर करीत विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी *संस्कारातून सृजनतेकडे* या नाटीकेचे सादरीकरण करीत चांगला अभ्यास करूनच सर्व परीक्षांना आम्ही स्वतः च सामोरे जाऊ असा छान संदेश दिला. विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम ऑनलाइन झूम ॲपच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचविण्यात आला.

कोरोनाच्या संकटकाळात गेली दीड वर्ष नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून ज्ञानदानाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवणाऱ्या या सर्व शिक्षकांप्रती नतमस्तक होत तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण, प्राचार्य शिवाजीराव भोसले, आचार्य प्र.के.अत्रे यांचे अनेक दाखले देत सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांनी केले तसेच सूत्रसंचालन सौरभ कंद यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.