Pimpri: सत्ताधा-यांना पडला शिक्षक दिनाचा विसर!

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अधिका-यांना घेतले फैलावर 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिक्षण विभागातील अधिका-यांना सलग दुस-यावर्षी शिक्षक दिनाचा विसर पडला आहे. उद्या शिक्षक दिन असून पालिकेने कोणतेही नियोजन केले नाही. शाळांना शिक्षकदिन साजरा करण्याबाबत कोणत्याही सूचना केल्या नाहीत. उद्या पाच सप्टेंबर शिक्षक दिन असल्याबाबत शिक्षणाधिकारी अनभिज्ञ आहेत. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला असल्याचा, आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. 

शिक्षण समितीच्या सदस्यांनी आज (मंगळवारी)शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची माहिती शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे यांना विचारली. परंतु, त्यांना उत्तर देता आले नाही. उद्या शिक्षक दिन आहे. त्याची पालिकेने काय तयारी केली, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाले.  शिक्षण समितीच्या सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, राजू बनसोडे यावेळी उपस्थित होते.

दत्ता साने म्हणाले, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिष्य व गुरु हे नाते अधिक प्रगल्भ होण्यासाठी व वर्षभर केलेल्या ज्ञानदानचे उतराई होण्यासाठी शिक्षकांच्या कौतुक म्हणून या दिवशी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  वर्षभर मेहनत घेऊन विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षकवृंद करीत असतात.

राष्ट्रवादीची सत्ता असताना महापालिकेमार्फेत देखील पाच सप्टेंबर रोजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक दिन साजरा केला जात होता. तसेच गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जात होते. परंतु, भाजपची सत्ता आल्यापासून शिक्षक दिन साजरा करणे बंद करण्यात आले आहे. सत्ताधा-यांना शिक्षक दिनाचा सलग दुस-यावर्षी विसर पडला आहे.

उद्या शिक्षक दिन असूनही महापालिकेच्या माध्यमिक व शिक्षण विभागामार्फत कुठल्याच प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे परपंरने साजरा होणारा शिक्षक दिन माध्यमिक व शिक्षण विभागातील जबाबदार अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे साजरा होणार नाही. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. भाजपच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपचे पदाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. याचा आम्ही निषेध करत असून संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

समितीच्या सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, शिक्षक दिन साजरा करण्यासाठी पाच लाखाच्या खर्चाचा विषय 16 ऑगस्ट रोजी झालेल्या समितीच्या सभेत आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. 20 दिवसांपूर्वी विषय मंजूर करुनही शिक्षक दिनादिवशी शिक्षक दिन साजरा केला जात नाही, ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे. तसेच शिक्षण समिती अस्तित्वात येऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटला. तरीही, शिक्षण समितीचे विषयपत्र छापले जात नाही. आयत्यावेळी विषय मंजूर केले जातात. जुनेच विषय मंजूर केले जातात, असेही त्या म्हणाल्या.

याबाबत बोलताना शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, शाळा शाळेच्या स्तरावर शिक्षक दिन साजरा करतात. पाहुण्यांची वेळ निश्चित झाली नाही. त्यामुळे सभापतींच्या सुचनेनुसार कार्यक्रम पुढे ढकलला आहे. आम्ही शिक्षक दिन विसरलो नाहीत. शाळांमध्ये कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.