Akurdi : शिक्षकांनी नोकरीकडे पॅशन म्हणून पाहावे – विनोद तावडे

एमपीसी  न्यूज – आजच्या शिक्षकांना विद्यार्थी हा उच्चशिक्षित करायचा आहे. शिक्षकांनी नोकरीकडे नोकरी न बघता नोकरीकडे पॅशन म्हणून बघावे जेणेकरुन विद्यार्थी चांगले शिकू शकतील, असे मत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज आकुर्डी येथे व्यक्त केली. 

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये इंडक्शन सेरेमनी कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, आकुर्डी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे कुलगुरु सतेज पाटील, प्रकुलगुरु प्रभात रंजन, कॅम्पसचे अध्यक्ष एस. के. जोशी, डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे संजय पाटील आदी उपस्थित होते.

विनोद तावडे पुढे  म्हणाले, विदयार्थ्यांना नुसते घोकमपट्टीचे शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळेल. तो विदयार्थी एखादया विषयात व्यापक विचार करू शकेल, अशी शिक्षणपद्धती सुरु होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शालेय अभ्यासक्रम शिकवत असताना विदयार्थ्यांचे अंर्तभूत गुण कोणते आहेत याची ओळख ‍शिक्षकांना असणे आवश्यक आहे.परिस्थितीशी निगडीत ज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे. घोकमपट्टीचे शिक्षण देणा-या पाठ्यपुस्तकांपासून विद्यार्थ्यांना मुक्त करुन मूल्याधिष्ठित आणि साध्या सोप्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना सक्षम करणाऱ्या शिक्षणाची गरज आहे.

पुढच्या २५ वर्षात जगाला लागणा-या मनुष्यबळाचा अभ्यास करून ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा विचार आपण केला पाहिजे. शिक्षकांनी अभ्यासक्रमाबरोबर व्यवहार्य, तसेच समाज आणि  निसर्गाशी संबध जोडून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. मुलांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान देणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळा आणि संस्थांत विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे शिक्षण आवश्यक आहे. यापुढे नापास ही संकल्पनाच राहणार नसून अशा विद्यार्थ्यांच्यातील कलागुण हेरुन कौशल्यविकासाची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची गरज आहे, असेही तावडे यांनी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.