Talegaon Dabhade : शिक्षकांनी धर्म, जात, राजकारण याच्या पलिकडे जाऊन सर्वसमावेशक भूमिकेतून विद्यार्थी घडवले पाहिजेत – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – शिक्षकांजवळ विवेक असायला हवा. शिक्षकांनी धर्म, जातीवाद, राजकारण याच्या पलीकडे जाऊन सर्व समावेशक भूमिका बाळगून विद्यार्थी घडवले पाहिजे. शिक्षकांनी सगळ्या विचारसरणीचा अभ्यास केला पाहिजे. शिक्षक हा जातीवादी नसावा. शिष्याचे उत्तम गुण जो जाणतो तो खरा शिक्षक आहे. शिक्षकांनी या क्षेत्रातील पावित्र्य जपले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने शिक्षक कृतज्ञता समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे हे होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक विलास काळोखे, गणेश खांडगे, संदीप काकडे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चंद्रभान खळदे, संजय वाडेकर, ललिता सबनीस, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.बी. जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.  याप्रसंगी प्राचार्य डॉ. संभाजी मलघे लिखित वेदनांचे चेहरे, कविता संग्रह व  आचार्यदर्शन या दोन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले, हिंदू , मुस्लिम, बौद्ध , शिख, इसाई, जैन, महावीर, महात्मा बसवेश्वर या सर्वच धर्मातले मानवतावादी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षका जवळ समाजवाद, संस्कृती संवर्धन, राष्ट्रावर प्रेम असायला हवे. शिक्षकांनी सगळ्या विचारसरणीचा अभ्यास केला पाहिजे. शिक्षक हा जातीवादी नसावा, शिष्याचे उत्तम गुण जो जाणतो तो खरा शिक्षक. शिक्षकांनी या क्षेत्रातील पावित्र्य जपले पाहिजे. चारित्र्यसंपन्न शिक्षकांसाठी हा शिक्षक दिन आहे .बेताल चारित्र्यहीन अशा शिक्षकांसाठी हा शिक्षक दिन नाही .जे आपल्या शिक्षणव्यवस्थेची पेशाची इमानदार आहेत राष्ट्राशी, तिरंग्याशी, मातीशी, संस्कृतीशी इमानदार आहे त्यांच्यासाठी हा शिक्षक दिन आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महात्मा फुले लोकशिक्षक आहेत ते सदैव वंदनीय  आहेतच. परंतु राधाकृष्णन अव्वल दर्जाचे श्रेष्ठ विचारवंत आहेत .म्हणून तर पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या श्रेष्ठ विज्ञानवादी, समाजवादी पंतप्रधानांनी त्यांना रशियाच्या राजदूत पदाचा सन्मान दिल.भारतीय परंपरेचा अभिमान असणारी आणि सहिष्णुतावादी हिंदुत्व, मानवतावादी – समाजवादी हिंदुत्व ,अशा विचारांचे राधाकृष्णन आहेत. म्हणूनच त्यांच्या जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वीणा भेगडे व प्राध्यापक दीप्ती कन्हेरी कर यांनी केले. तर आभार प्रा. काशिनाथ अडसूळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.