medankarwadi : रस्त्यातील बंद टेम्पोवर आदळला सिलेंडरचा ट्रक

टेम्पोचालक ठार; मेदनकरवाडीतील घटना

एमपीसी न्यूज -रस्त्यात टेम्पोने एअर पकडल्याने बंद पडलेल्या टेम्पोचा एअर काढण्याच्या प्रयत्नात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या भारत गॅसच्या सिलेंडरने भरलेल्या ट्रकची टेम्पोस जोराची धडक बसल्याने बंद पडलेल्या टेम्पोचा चालक जागीच ठार झाला.

पुणे – नाशिक महामार्गावरील मेदनकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आणि अजिंक्य वजन काट्याजवळ बुधवारी (दि. १६) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. चाकण पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, सिलेंडरने भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे.

मनोज चंद्रकांत कांबळे (वय -२६ वर्षे, रा.धारवी, मुंबई, मूळ रा. तळेगाव भोगेश्वरी, ता. दिवणी, जि. लातूर) असे या अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. मयूर मनोज कोहकडे (वय – २४ वर्षे, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोहकडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी ट्रक अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे- नाशिक महामार्गावरील मेदनकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आणि अजिंक्य वजन काट्याजवळ बुधवारी (दि. १६ जानेवारी) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान टेम्पोचालक मनोज हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोने (एमएच.१२, डीटी ८६११) एअर पकडल्यामुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला घेवून टेम्पोचा एअर काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या सिलेंडरने भरलेल्या ट्रकची (एमएच १४ ईएम १८४३) पुढील टेम्पोस जोराची धडक बसल्याने टेम्पोचा एअर काढत असलेला टेम्पो चालक कांबळे हा जागीच ठार झाला.

कांबळे याच्या मागे पत्नी, आई, वडील, दोन बहिणी, तीन भाऊ असा परिवार आहे. पोलिसांनी याप्रकरणी रात्री उशिरा ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.