Maval : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सडवली गावाच्या हद्दीत विचित्र अपघातात टेम्पो चालक ठार

एमपीसी न्यूज – पुढे जात असलेल्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने झालेल्या विचित्र अपघातात पाठीमागून येणारा पिकअप टेम्पो चालक ठार झाला. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सडवली (ता.मावळ) गावाच्या हद्दीत झाला.

सरवनकुमार रामचंदर( वय १९,रा.कन्होरिया, हरियाणा), असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी चालकाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सडवली गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७६ येथे पिकअप टेम्पो (क्र.एमएच १४- जीवाय ८३६०) आला असता पुढे जात असलेल्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामध्ये टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने
पिकअप टेम्पो रस्ता दुभाजकाला धडकला. यामध्ये लोखंडी अँगलवर टेम्पो जोरात आदळल्याने चालक गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडला.

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नागरगोजे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.