Bhosari : पूरग्रस्तासांठी दिल्या दहा हजार वह्या, भैरवनाथ कबड्डी संघाच्या आवाहनला प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघाचे अध्यक्ष योगेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांसाठी ‘एक वही आणि पेन’ हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले असून त्याला भरभरून  प्रतिसाद मिळत आहे. अजय रसाळ यांनी आज (शनिवारी) पूराने बाधित विद्यार्थ्यांना देण्यासाठी दहा हजार वह्या संघाकडे दिल्या आहेत. तर, डॉ.  साबळे यांनी 500 पुस्तके दिली आहेत.

संघाचे अध्यक्ष योगेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघातर्फे पूरग्रस्तांसाठी वह्या आणि पेन गोळा केल्या जात आहेत. त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहेत. कबड्डी संघाच्या विविध क्लबने मदतीचा हात पुढे करत पुराने बाधित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वह्या, आणि पेन दिल्या आहेत. अजय रसाळ यांनी आज (शनिवारी) दहा हजार वह्या संघाकडे दिल्या आहेत. संघाचे एक लाख वह्या आणि एक लाख पेन देण्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

भैरवनाथ कबड्डी संघाचे अध्यक्ष योगेश लांडगे म्हणाले, ”कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. विद्यार्थ्यांसाठी एक वही आणि पेन देण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. त्याला भरभरुन प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत एक लाख वह्या आणि पेन जमा झाल्या आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरस्थितीमुळे यंदा संघाने दहीहंडी उत्सवावरील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यातून होणा-या बचतीतून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वही आणि पेन दिले जाणार आहेत.

पुराने बाधित झालेल्या भागातील पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संघातर्फे गोधन पण देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघाचे रंजीत गव्हाणे, माधव धावडे, राहुल पुंडे, संदीप सुर्वे, राहुल गुळवे, गणेश गवळी यांनी पुढाकार घेतला आहे.

त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या आरोग्यासाठी संघातर्फे डॉ. भूषण पारगे, डॉ. धनंजय पाटील यांच्यासह 12 डॉक्टरांची टीम गेली होती. त्यांनी सहा दिवस राहून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. सहा लाख रुपये किमतीची औषधे नागरिकांना दिली आहेत, असेही लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.