Pune News : दहा वर्षीय मुलीचे अपहरण, दारू पाजून केले लैंगिक शोषण

एमपीसी न्यूज : पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोघांनी घराजवळ खेळत असणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीचे दुचाकीवरून अपहरण केले. त्यानंतर तिला अज्ञातस्थळी घेऊन जात जबरदस्तीने दारू पाजली आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी नंतर याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अनोळखी व्यक्तीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी आपल्या आईसह वानवडी परिसरात राहते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असताना तोंडओळख असलेला आरोपी आणि आणखी एक व्यक्ती तिच्याजवळ आले. तिला फूस लावून दुचाकीवर जबरदस्तीने बसवले आणि अपहरण केले. त्यानंतर तिला अज्ञात ठिकाणी घेऊन जात तिला मद्य पाजले आणि तिचे लैंगिक शोषण केले.

रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली. यातील एक आरोपी हा तोंड ओळखीचा आहे. परंतु त्याचे पूर्ण नाव माहिती नाही. दुसरा अज्ञात आहे. या दोघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.