Pimpri : ठेकेदाराच्या हिताच्या निविदा; आयुक्तांचे उत्तर असमाधानकारक – खासदार डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे कंत्राटदाराचा फायदा होईल अशा पद्धतीने निविदा काढल्या जातात का ? अशी शंका येत आहे. आयुक्तांना त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्याची सविस्तर माहिती देण्याची सूचना आयुक्तांना केली असल्याचे, शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (गुरुवारी) सांगितले. तसेच शहरात कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळ्यात कचरा साचल्याने साथीचे आजार पसरु शकतात. त्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेडझोनचा प्रश्न सुटू शकतो असा आशावाद असून रेडझोन परिसरातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्याची सूचना आयुक्तांना केल्याचेही त्यांनी सांगितले. 

खासदार झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे आज पहिल्यांदाच पिंपरी महापालिकेत आले होते. शहरातील अवैध बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, शहरातील कचरा समस्या, नाशिक फाटा ते मोशी दरम्यानचे सहापदरी रस्तारूंदीकरण, भोसरीचे रुग्णालय अशा विविध प्रलंबित प्रश्नांबाबत डॉ. कोल्हे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोक्षी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या शहरात सुरु असलेल्या योजनांची सविस्तर माहिती घेतली. स्मार्ट सिटीअंतर्गत कोणते आणि किती प्रकल्प सुरु झाले आहेत. त्याची माहिती घेतली. स्मार्ट सिटीची लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले, शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाळ्यात कचरा ओला होवून दुर्गंधी सुटते. त्यामुळे साथीचे आजार डोके वर काढू शकतात. त्यासाठी ठोस पाऊले उचलण्यात यावीत.

मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चांगला आहे. परंतु, आपण मुळापर्यंत जाऊन सगळ्या गोष्टी तर देत नाहीत ना? याचा विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयात होत असलेली पदव्युत्तर संस्था कौतुकास्पद आहे. संस्थेतील कर्मचारी नेमण्याची सविस्तर माहिती मागविली आहे. भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी सूचना केल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

रेडझोनची सविस्तर माहिती घेत आहे. तो प्रश्न सुटावा यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरु आहे. गेल्या तीन महिन्यात रेडझोनचा विषय समजून घेत असताना आलेला अनुभव पाहता रेडझोनचा प्रश्न सुटू शकतो असा आशावाद आहे.  रेडझोन परिसरातील नागरिकांना महापालिकेतर्फे सोयी-सुविधा देण्याची सूचना आयुक्तांना केल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.