Pimpri : महापालिका मुख्यालयातील अतिक्रमण विभाग बरखास्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मुख्य कार्यालयातील अतिक्रमण विभाग बरखास्त करण्यात आला आहे. या विभागातील सर्व कर्मचारी, वाहने, इतर साहित्यांसह ‘बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन’ या विभागात विलिनीकरण करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक कार्यक्षमतेने व प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर अतिक्रमण विभाग, पथके गठित केले होती. त्यामध्ये बदल करून महापालिका मुख्य कार्यालयाच्या स्तरावर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाचे सह शहर अभियंता यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण नियंत्रण, निर्मूलनबाबतचे कामकाज बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात समाविष्ट केले होते. विभागाला ‘बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन’ असे नाव दिले आहे.

अतिक्रमण मुख्य कार्यालयाकडील कामकाज हे बांधकाम परवानगी व अनधिकृत, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागामार्फत होत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभाग मुख्य कार्यालय येथील कर्मचारी वर्ग आणि वाहने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभागाकडे वर्ग करण्याची मागणी सह शहर अभियंत्यांनी केली होती.

त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेतील मुख्य कार्यालयातील अतिक्रमण विभाग बरखास्त केला आहे. या विभागातील सर्व कर्मचारी, वाहने, इतर साहित्यांसह ‘बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन’ या विभागात विलिनीकरण करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.