India Corona Update : भयावह ! चार दिवसांत देशात नऊ लाख कोरोना बाधितांची नोंद 

एमपीसी न्यूज – देशात मागील चार दिवसांत नऊ लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी (दि.15) पहिल्यांदाच 24 तासांत दोन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज रविवारी (दि.18) सलग चौथ्या दिवशी 2 लाख 61 हजार 500 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ही आजवरची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. तसेच, गेल्या 24 तासांत दिड हजार रुग्णांचा मृत्यू देखील झाला. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 47 लाख 88 हजार 109 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 28 लाख 09 हजार 643 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1 लाख 38 हजार 423 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग तिसऱ्या दिवशी एक लाखाहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 18 लाख 01 हजार 316 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत 1 हजार 501 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 77 हजार 150 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.19 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 86.62 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 26 कोटी 65 लाख 38 हजार 416 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 15 लाख 66 हजार 394 चाचण्या शनिवारी (दि.17) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.