Test Match World Cup Tournament : भारतीय फिरकीने केली कांगारूची शिकार…डावाच्या फरकाने मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज(विवेक कुलकर्णी)- यह तो सिर्फ आगाज है,अंजाम अभी बाकी है,असेच काहीसे म्हणत भारतीय संघाने बॉर्डर गावस्कर शृंखलेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या (Test Match World Cup Tournament) ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि तब्बल 132 धावांच्या फरकाने पराभूत करत शृंखलेत विजयी श्रीगणेशा केला आहे.

कसोटी सामन्याच्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ही मालिका जिंकणे दोन्ही संघासाठी आणि खास करुन भारतीय संघासाठी अत्यावश्यक असल्याने भारतीय संघ मायदेशी सुरू असलेल्या कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवेल असा अंदाज ही मालिका सुरू होण्याआधीच अनेक मोठमोठ्या खेळाडूंनी आणि विविध समालोचकांनी व्यक्त केला होताच,तो वृथा नव्हता हे सिद्ध करताना भारतीय संघाने नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा दणदणीत पराभव करत चार सामन्याच्या मालिकेत 1/0 अशी विजयी आघाडी घेतली.

Bhosari News : भोसरी येथे सोमवारी रक्तदान शिबिर

कर्णधार रोहित शर्माचे झुंजार शतक,त्याला अष्टपैलू जडेजा आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतके करत दिलेली महत्वपूर्ण साथ यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 223 धावांची मोठी आघाडी घेतली आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघावर एकप्रकारे मोठे दडपण आणले होतेच,त्याचदडपणाखाली बलाढय ऑस्ट्रेलियन फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. ऑस्ट्रेलियन संघ  दुसऱ्या डावात 100 धावा सुद्धा पुर्ण करू शकला नाही.

रवीचंद्रन अश्विन ,जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या कांगारू फलंदाजांना  ते तोडता आले नाही ते नाहीच,त्यामुळेच आजच्या तिसऱ्या दिवशीच भारतीय संघाने दणदणीत विजय प्राप्त केला.अश्विनने या विजयात 5 बळी मिळवून मोठा वाटा उचलला.त्याने 31 व्यांदा एका डावात 5 बळी मिळवण्याचा पराक्रम  केला, त्याला जडेजा,शमी आणि अक्षरनेही उत्तम साथ दिली.

आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर कालच्या अक्षर आणि जडेजा या नाबाद जोडीने आजही अतिशय आत्मविश्वासाने सुरुवात करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थ सामना केला.जडेजा(Test Match World Cup Tournament)  उत्तम खेळत आहे असे वाटत असतानाच मर्फीच्या गोलंदाजीवर 70 धावांवर असताना चकला आणि त्रिफळाबाद झाला.जडेजा शतक करेल असे वाटत असतानाच मर्फीच्या फिरकवर चकला,पण त्याने अक्षर पटेल सोबत 88 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली होती, अन त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीने सुध्दा अशीच आत्मविश्वासाने फलंदाजी करत अक्षर सोबत आणखी एक अर्धशतकी भागीदारी करुन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अंत बघितला.

Chinchawad By Election : स्ट्रॉंग रूमची तयारी, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापनाची उमेदवारांना दिली माहिती

 

शमीने केवळ 47 चेंडतच घणाघाती 37 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि तीन उत्तुंग षटकार सामील होते. यामूळे ऑस्ट्रेलियन गोलंदाज पुरतेच निराश झाले. शमी बाद झाल्यानंतरही अक्षरने आपली लढाई चालूच ठेवली, त्याचा खेळ बघता तो आपले पहिले शतक पूर्ण करेल असे वाटतही होते, मात्र दुर्दैवाने तो शतक काही पूर्ण करू शकला नाही, पण त्याने त्यापेक्षाही महत्वपूर्ण अशा 84 धावा करुन भारतीय संघाच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या झुंझार खेळीमुळेच भारत ऑस्ट्रेलियन संघावर 223 धावांची मोठी आघाडी घेऊ शकला.

ऑस्ट्रेलियाकडुन टॉड मर्फीने आपल्या पहिल्याच कसोटीत दिग्गज  भारतीय फलंदाजीला नाचवून 7 बळी मिळवून आपले कसोटी पदार्पण संस्मरणीय केले.223 धावांच्या आघाडीचा सामना करताना ऑस्ट्रेलियन संघाला हे आवाहन जराही पेलले नाही, त्यासाठी जशी सुरुवात व्हायला हवी होती तशी मुळीच झाली नाही. रोहीतने नेहमीप्रमाणे आपल्या नेतृत्वशैलीची झलक दाखवत दुसऱ्याच षटकात रवी अश्विनने गोलंदाजी देऊन ऑस्ट्रेलियन सलामीजोडीवर मनोवैज्ञानिक दडपण आणले,अन याच दडपणाखाली ख्वाजा केवळ 5 धावा करून कोहलीच्या हाती झेल देऊन बाद झाला,या विकेटमुळे रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीला आणखीन धार आली.

आणि त्याने वॉर्नर रेनशॉ ,आणि हँडस्कोंबला बाद करुन ऑस्ट्रेलियन संघाला पुरते अडचणीत आणले,हे कमी की काय म्हणून दुसऱ्या  बाजूने जडेजाने लाबूशेनला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था 6 बाद 64 अशी बिकट करून टाकली,पाठोपाठ त्याने कांगारू कर्णधार पॅट कमिन्सलाही आल्यापावली तंबूत परत पाठवले आणि ऑस्ट्रेलिया संघ आजच तेही डावाच्या पराभवाची नामुष्की ओढावून घेणार हे स्पष्ट  झाले,पाहुण्या (Test Match World Cup Tournament) संघासाठी एकच अंधूकशी आस होती, ती म्हणजे स्टिव्ह स्मिथ हा झुंझार आणि लढवय्या फलंदाज एका बाजूने लढत होता, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळणार नाही याचा शमीने पुरेपूर बंदोबस्त करत दोन ताबडतोब विकेट घेतल्या,या वाहत्या गंगेत अक्षरनेही एक बळी मिळवत आपला हात धुवून घेतला. स्मिथ असहाय्यपणे दुसऱ्या बाजूने आपल्या बलाढ्य संघाची ही केविलवाणी अवस्था निमूटपणे बघत 25 धावा करुन नाबाद राहिला.

 

त्याला कोणीही साथ न देवू शकल्याने ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात केवळ 91 धावाच करता आल्या. त्यांना त्यामुळेच  नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले.एक डाव आणि 132 धावांच्या मोठया फरकाने भारतीय संघाने हा विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.दोन्ही डावात मिळून 7 बळी आणि भारतीय संघ संकटात सापडलेल्या अवस्थेत असताना केलेल्या 70 धावांच्या मोठ्या आणि महत्वपूर्ण खेळीमुळे अष्टपैलू रविंद्र जडेजाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव 177 व दुसरा डाव सर्वबाद 91
स्मिथ नाबाद 25,वॉर्नर 10,लाबूशेन 17
अश्विन 37/5,शमी 13/2,जडेजा 34/1
पराभूत विरुद्ध
भारत
पहिला डाव 400
रोहीत 120,जडेजा 70,अक्षर 84,शमी 37
मर्फी 124/7,कमिन्स 78/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.