Pune Crime News : ‘त्या’ कारागिराला अटक, 28 लाखाचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज : पॉलिश करण्यासाठी दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या त्या कारागिराला अखेर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल 28 लाख रुपये किमतीचे दागिनेही जप्त करण्यात आले. मशुदिल उर्फ मैदुल लालचंद शेख (वय 52, रा. भोहरी आळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवार पेठेतील सराफ व्यावसायिक मनोज मन्ना यांच्याकडे इतर सराफ व्यवसायिक सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी देतात. तर आरोपी हा मन्ना यांच्या दुकानात कारागीर म्हणून काम करत होता. अनेक वर्षापासून तो काम करत असल्यामुळे फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पॉलिश करण्यासाठी दिलेले 36 लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन तो पसार झाला होता. मनोज मन्ना यांनी याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी मशुदिल हा दौड रेल्वे स्टेशन परिसरात थांबला असून, तो पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दागिने मिळाले. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 28 लाख 52 हजार रुपयांचे दागिने आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.