Pimpri: ‘त्या’ आजीबाई सुखरूपपणे परतल्या घरी; ‘एमपीसी न्यूज’च्या प्रयत्नांना यश

राजकीय मंडळी आणि पोलीस प्रशासनाची अनास्था असल्याने तिथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर याबाबत 'एमपीसी न्यूज'च्या टीमला माहिती मिळाली.

एमपीसी न्यूज – निगडीमधील यमुनानगर परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत असलेल्या एका आजीबाईला त्यांच्या नातेवाईकांकडे सुखरूपपणे पोहोचविण्यासाठी ‘एमपीसी न्यूज’च्या टीमला यश आले. स्थानिक तरुण आणि वृद्धाश्रमाच्या मदतीने ही मोहीम ‘एमपीसी न्यूज’च्या टीमने पार पाडली.

यमुनानगर मधील तरुण योगेश्वर निघोजकर, मिहीर देशपांडे, किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य, बीड जिल्ह्यातील केज येथील स्थानिक पत्रकार दत्तात्रय भाकरे, एमपीसी न्यूजचे संपादक हृषीकेश तपशाळकर, पत्रकार दिग्विजय जिरगे, पत्रकार श्रीपाद शिंदे या टीमने यासाठी विशेष परिश्रम केले आहे.

यमुनानगर मध्ये सोमवारी 80 वर्षाच्या आजी विव्हळत रस्त्याच्या बाजूला बसल्या होत्या. याबाबत यमुनानगर मधील तरुण योगेश्वर निघोजकर, मिहीर देशपांडे या तरुणांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच किनारा वृद्धाश्रमच्या प्रीती वैद्य यांच्याशी संपर्क केला.

तरुणांनी याबाबत ट्विट देखील केले. पण राजकीय मंडळी आणि पोलीस प्रशासनाची अनास्था असल्याने तिथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर याबाबत ‘एमपीसी न्यूज’च्या टीमला माहिती मिळाली.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. दरम्यान आजीबाईंशी काही तरुण बोलतानाचा एक व्हिडिओ एमपीसी न्यूजच्या हाती लागला. त्यांनी त्यात त्यांच्या केज तालुक्याचा उल्लेख केल्याचे समजले.

त्यावरून ‘एमपीसी न्यूज’चे पत्रकार दिग्विजय जिरगे यांनी मराठवाड्यातील पत्रकारांशी सलग चर्चा करून केज तालुक्यातील पत्रकार दत्तात्रय भाकरे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आजींच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात आली.

दरम्यान, आजींना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नातेवाईकांना रुग्णालयात ताबडतोब बोलावून आजींना त्यांच्याकडे सोपविले. डॉक्टरांनी आजींना बुधवारी (दि. 5) डिस्चार्ज दिला. त्यानंतर आजी आपला मुलगा आणि नातवासोबत घरी गेल्या.

आजींना वयोमानानुसार ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी तसेच इतर शारीरिक व्याधींचा त्रास आहे. आजी घरातून अचानक निघून गेल्याने घरचे अत्यंत काळजीत होते. मात्र, ‘एमपीसी न्यूज’च्या टीमचा फोन जाताच नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.