Pune: ‘पॉझिटिव्ह’ बातमी ! 100 वर्षांच्या आजींनी केली कोरोनावर मात

The 100-year-old grandmother overcame on Corona आजी बाई दराडे या आपल्या विवाहित मुलीच्या घरी चंदननगर येथे राहतात. त्यांच्या घरातील सर्वांना कोरोनाची लागण झाली होती.

एमपीसी न्यूज- पुण्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सध्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. परंतु, या सर्व नकारात्मक गोष्टींमध्ये एक चांगली बातमी समोर आली आहे. चंदननगर येथील एका 100 वर्षांच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

बाई दराडे असे या आजींचे नाव असून त्यांनी वयाच्या शंभरीत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकून इतर रुग्णांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्या ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. आजींच्या घरातील सर्वच सदस्य पॉझिटिव्ह आढळून आले होते.

आजी बाई दराडे या आपल्या विवाहित मुलीच्या घरी चंदननगर येथे राहतात. त्यांच्या घरातील सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. आजींची चाचणीही नंतर पॉझिटिव्ह आली.

आजींचे जावई हरी घुगे म्हणाले की, मी आणि माझ्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. माझ्यात कोणतीच लक्षणे नव्हती. त्यामुळे मला घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते. तर माझ्या पत्नीवर रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरु आहेत. आमच्या आईंनाही याची लागण झाली. पण त्या 10 दिवसांत बऱ्या होऊ घरी परतल्या आहेत.

विमाननगर येथील कोविड सेंटरमधून आजींना निरोप देताना तेथील कर्मचाऱ्यांनी फुलांची उधळण करत आनंद साजरा केला. आजींनी या वयात कोरोनावर मात केल्याने कोविड सेंटरमधील कर्मचारी आनंदित झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.