Wakad : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील एकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला अटक केली. ही कारवाई आज (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास केली असून पौड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी (दि. 6) अटक करण्यात आली. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली.

रतन रोकडे (वय 21, रा. रोकडे वस्ती, चिखली) असे मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील आरोपीचे नाव आहे. तर मंगेश नामदेव पालवे (वय 28, रा. मोरेवाडी, ता. मुळशी) असे पौड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास कस्पटे वस्ती येथील कस्पटे चौकात वाकड पोलीस ठाण्यातील टीम क्रमांक 10 आणि 17 कारवाई करत होते. त्यावेळी देहूरोड पोलीस ठाण्यातील मोक्का कारवाई झालेला आणि  रावण साम्राज्य टोळीतील फरार आरोपी रतन रोकडे माउली टी सेंटर येथे उभा असल्याचे दिसले. त्यावरून पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची ओळख आणि चौकशी करून तो मोक्काच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. यावरून रतनला अटक केली. त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन, देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक आणि वाकड पोलीस ठाण्यात दरोडा घातल्याप्रकरणी एक असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. देहूरोड पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. वाकड पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

तसेच शनिवारी (दि. 6) वाकड पोलीस ठाण्यातील टीम क्रमांक तीन आणि 17 हे भूमकर चौकात कारवाई करत होते. त्यावेळी मंगेश पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो पौड पोलीस ठाण्यातील एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले. त्याच्यावर पौड पोलीस ठाण्यात तीन आणि तळेगाव पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उप निरीक्षक हरीश माने, सहायक पोलीस फौजदार शिंपी, पोलीस कर्मचारी कांता बनसोडे, रमेश गायकवाड, विक्रम कुदळ, गणेश गिरीगोसावी, सुरज सुतार, नितीन गेंजगे, मुकेश येवले, सचिन जगताप, वेलापुरे, प्रशांत गिलबिले, अविनाश गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.