Hinjawadi : अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी द्या

लहुजी शक्ती सेनेची मागणी

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील कासारसाई ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना त्वरीत फाशी देण्यात यावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेमार्फत करण्यात आली आहे. याबातचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिले आहे.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खिलारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खिलारे, सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड उपस्थित होते.

हिंजवडी येथील कासरसाई ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना घडली. त्यातील एकीचा बुधवारी (दि. 19) मृत्यू झाला. तिच्यावर दोन नराधमांनी बलात्कार केला. या घटनेने रविवारी संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. संत तुकाराम साखर कारखान्याचे कामगार पाळत राहत असून त्या शेजारी हे नराधम राहत असे. या नराधमांनी त्या चिमुरड्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून झुडुपात नेले. त्यांच्यावर पाळीपाळीने अमानुषपणे बलात्कार केला. पीडित मुली या फक्त 10 ते 12 वर्षाच्या आहेत. दरम्यान, याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक केली असून न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे सामूहिक बलात्कार भारतात घडू नये, याकरिता 15 ऑगस्ट रोजी 18 वर्षाच्या आतील मुलींवर बलात्कार किंवा लैंगिक छळाची घटना घडल्यास आरोपींची त्वरित चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी तसेच फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात न आल्यास आम्ही सर्व लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र व तसेच सर्व सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.