Pimpri : भर दिवसा अठरा घरफोड्या करणारे आरोपी गजाआड (व्हिडिओ)

21 तोळे सोन्याचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज – घराची पाहणी करून भर दिवसा घरात घुसून चोरी करणा-या दोन चोरट्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 214.05 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, दुचाकी असा एकूण 6 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ, कोथरुड, कोंढवा आणि भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 12 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

रविकिरण माताबदल यादव (वय 22, रा. ओमसाई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 303, शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख. मूळ रा. पतेरीया, पो. गढचपा, ता. माणिकपूर, जि. चित्रकूट उत्तरप्रदेश) आणि अनुपम नरेंद्र त्रिपाठी (वय 24, रा. साई अपार्टमेंट, बी विंग, मोरया पार्क, पिंपळे गुरव. मूळ रा. दरवेशपुरा, पो. भरवारी, ता. चायल, जि. कोसांबी उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी मधील चंद्रहिरा अपार्टमेंट या वसाहतीमध्ये शनिवार (दि. 11 ऑगस्ट) रोजी घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असता घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना वसाहतीच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याच्या आधारे आरोपींची ओळख पटवून यादव आणि त्रिपाठी यांना ताब्यात घेतले.

 

त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता सांगवी येथील घरफोडीचा गुन्हा केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यावरून त्यांना अटक केली. तसेच दोघांनी मिळून सांगवी, सुस रोड, पाषाण, सुतारवाडी, चांदणी चौक, कोथरूड, कोंढवा, लोहगाव मधील तब्बल 18 ठिकाणी भर दिवसा घरफोडी केल्याचेही कबूल केले. या कारवाईमुळे सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ, कोथरुड, कोंढवा आणि भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक असे एकूण 12 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विमानतळ, हिंजवडी, कोथरूड भागातील आरोपींनी दाखविलेल्या आणखी चार ठिकाणचे गुन्हे अद्याप दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ते गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

 

आरोपींकडून 215.05 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, दुचाकी असा एकूण 6 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्रिपाठी हा रियल इस्टेट एजंटचे काम करीत आहे. तर यादव याचे ताम्हाणे चौक बाणेर येथे दुचाकी वाहनाचे गॅरेज आहे. दोघेही मूळचे उत्तरप्रदेश येथील असल्याने महाराष्ट्रात चोरी केलेले दागिने ते उत्तरप्रदेश मधील ओळखीच्या सराफाला दागिने विकत असत. त्यांनी विकलेले दागिने हस्तगत करण्याची कारवाई सुरु आहे.

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलीस फौजदार, भालेराव, पोलीस हवालदार माडीवाले, पोलीस नाईक रोहिदास बो-हाडे, कैलास केंगले, भिसे, नितीन दांगडे, पोलीस शिपाई शशिकांत देवकांत, अरुण नरळे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, दीपक पिसे, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.