Pimpri: वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने रुग्णालयातून ठोकली धूम!

The accused, who was brought for medical examination, was ran away from ycm hospital in pimpri

एमपीसी न्यूज- पोलीस कोठडी मिळालेल्या तीन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असता एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. ही घटना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) मंगळवारी (दि.26) घडली. इतर दोन आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे.

कृष्णा उत्तम सोनवणे (वय 19, रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आकाश बाबुलाल पवार (वय 21, रा. अयप्पा मंदिराजवळ, काळेवाडी), गणेश ऊर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय 19, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नढेनगर काळेवाडी) या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे.

तिघां विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आर. एस. मुदल यांनी मंगळवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनही आरोपींना गंभीर स्वरुपाची दुखापत करणे या गुन्हय़ाखाली वाकड पोलिसांनी अटक केली होती. त्यांना वैद्यकीय तपासणी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी वायसीएम रुग्णालय येथे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आणण्यात आले होते.

त्यावेळी तीनही आरोपींनी पोलिसांशी वाद घालत झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी कृष्णा सोनवणे आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर अन्य दोघांचा पळून जाण्याचा प्रयत्न पोलिसांच्या तत्परतेमुळे फसला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.