Pune : मराठा मोर्चा हिंसाचार करणारे एटीएसच्या कारवाईत उघड झाले – संभाजी ब्रिगेड

एमपीसी न्यूज –  मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, या हिंसाचारात सहभागी असणारे लोक कोण आहेत हे एटीएसने केलेल्या कारवाईत उघड झालं आहे, म्हणत संभाजी ब्रिगेडकडून संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत संभाजी ब्रिगेडकडून मराठा तरुणांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील करण्यात आली. 

यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, पुणे विभाग अध्यक्ष किरणराज घाडगे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सिद्धार्थ कोंढाळकर, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

जे भिडे, एकबोटे आषाढी वारीला कधीही पंढरपूरला जात नाहीत, हे लोक पोलिसांनी मज्जाव करूनही पंढरपूरमध्ये हजर होते. यातूनच मराठा आरक्षणातील हिंसक घटनांमध्ये सरकार पुरस्कृत शक्ती काम करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे.

मराठा समाज कधीही हिंसाचार करणार नाही. मात्र, सरकारनेच मराठा समाजाचे आंदोलन बदनाम करण्यासाठी शासन पुरस्कृत संघटनाकरवी हिंसाचार घडवल्याचा आरोप यावेळी आखारे यांनी केला आहे. तसेच मराठा समाजातील तरुणांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.