Pimpri : प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरटीओ अधिका-याला फासले काळे

एमपीसी न्यूज – वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेत वाहन चालविण्याची चाचणी घेणा-या आरटीओ अधिका-याच्या तोंडाला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. चालकांना परवाना देण्यासाठी संबंधित अधिकारी बेकायदेशीर पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप संघटनेने केला असून त्यासाठी त्या अधिका-याने एका इसमाची नियुक्ती देखील केली होती, असेही सांगण्यात आले आहे. हा प्रकार आज (शुक्रवारी) वल्लभनगर येथील वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेत घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन परवाना मिळविण्यासाठी चालकांना वाहतूक विभागाच्या अधिका-यांसमोर ट्रायल द्यावी लागते. त्यांची संमती आल्यास चालकाला वाहन चालन परवाना मिळतो. यासाठी वल्लभनगर येथील कार्यालयात  सिद्धाराम पांढरे सक्षम अधिकारी आहेत. मात्र, वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी ते बेकायदेशीरपणे पैशांची मागणी करतात. खास पैसे घेण्यासाठी त्यांनी प्रमोद नावाच्या इसमाची नेमणूक केली आहे. प्रमोद परवाना मिळविण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून पैसे गोळा करण्याचे काम करतो.

प्रहार संघटनेच्या वतीने याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे. मात्र, पाटील यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. आज (शुक्रवारी) दुपारी दोनच्या सुमारास प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वल्लभनगर येथील वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या बाहेर पैसे गोळा करणा-या प्रमोदकडे विचारणा केली. त्यावर त्याने तो पांढरे आणि क्षीरसागर नावाच्या अधिका-यांसाठी पैसे गोळा करण्याचे काम करीत असल्याचे समजले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहन चालविण्याची चाचणी सुरु असलेल्या वाहनात जाऊन पांढरे यांच्या तोंडाला काळे फासले.

परिवहन कार्यालयांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासनाने संपूर्ण कार्यप्रणाली ऑनलाईन केली आहे. सर्व प्रकारची कामे ऑनलाईन होत असल्याने या खात्यात होणारा भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता होती. मात्र, राजरोसपणे अधिका-यांसाठी पैसे गोळा करणारे एजंट अशा संस्थांच्या बाहेर उभे राहू लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या विश्वासार्हतेसह स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराला यामुळे तिलांजली मिळाली आहे.

याप्रकरणी सिद्धाराम जोतेप्पा पांढरे (वय 43) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौतम पंडित सुराडकर, नीरज प्रभाकरराव कडू आणि अन्य 12 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ‘पांढरे सरकारी काम करत असताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आले. तुम्ही भ्रष्टाचार करता असे म्हणून त्यांनी पांढरे यांच्या तोंडाला काळे फासले. प्रहार संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देऊन सरकारी कामात अडथळा केला.’ भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. गाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.