Pimpri News : प्रशासन झुकले, अभियंत्यांच्या बदल्यांना पुन्हा स्थगिती

0

एमपीसी न्यूज  – अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याच्या दबावापुढे झुकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तीन महिन्यांपूर्वीच्या आदेशावर पुन्हा पीछेमुड होत 25 अभियंत्यांच्या बदल्यांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी – चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. त्यानुसार 24 डिसेंबर 2020 रोजी पिंपरी महापालिकेच्या स्थापत्य विभागातील बदलीस पात्र ठरलेल्या कनिष्ठ व उपअभियंत्यांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या होत्या.

_MPC_DIR_MPU_II

उपअभियंता संवर्गातील 5 आणि कनिष्ठ अभियंता संवर्गातील 20 अशा 25  अभियंत्यांच्या बदल्या त्यावेळी करण्यात आल्या. तथापि, प्रशासकीय कारणास्तव 6 जानेवारी 2021  रोजी या आदेशास प्रशासन विभागामार्फत 31  मार्च 2021 पर्यंत स्थगिती देण्यात आली.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चिकटून बसलेल्या या अभियंत्यांपुढे प्रशासनाला झुकावे लागले. आपल्याच आदेशावर प्रशासनाला पीछेमुड होण्याची वेळ आली. दोन आठवड्यातच प्रशासनाने आपला आदेश रद्दबादल केला. बदली आदेशाला 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी 1 एप्रिल 2021 रोजी पुन्हा नवीन आदेश जारी केला आहे.

24  डिसेंबर 2020 रोजी घेतलेल्या स्थापत्य विभागातील 25 कनिष्ठ व उपअभियंत्यांच्या बदल्यांच्या आदेशास आता पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, संबंधित उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी पुर्वीच्या विभागांमध्येच पुढील आदेश होईपर्यंत कामकाज करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment