Pimpri : शहरातील अनधिकृत होर्डिंगची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ – बाबू नायर 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंगची माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. अनधिकृत होर्डिंग अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, होर्डिंग अंगावर पडल्याने चार महिन्यापूर्वी शहरातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर आकाश चिन्ह व परवाना विभागाकडे शहरातील अनधिकृत होर्डिंगची माहिती आपण मागविली होती. शहरात किती अनधिकृत फलक आहेत? किती परवानग्या दिल्या आहेत? पालिकेच्या किती मोकळ्या जागेत होर्डिंग उभारले आहेत. जाहिरात फलकाच्या माध्यमातून पालिकेला आजपर्यंत किती उत्पन्न मिळाले आहे? याची सविस्तर माहिती मागविली होती. तथापि, तीन महिन्यांचा काळ लोटला तरी आकाश चिन्ह परवाना विभागाने माहिती दिली नाही.

होर्डिंग अंगावर आणखीन बळी जाण्याची पालिका प्रशासन वाट पाहात आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत नायर पुढे म्हणाले, महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर त्वरित कारवाई करावी. धोकादायक होर्डिंग काढावेत. होर्डिंगबाबत धोरण करण्यात यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.