Talegaon Dabhade News : नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्थलांतर व्यापारी संकुलात होणार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्थलांतर गाव विभागातील मारुती मंदिर चौकातील व्यापारी संकुलात केले जाणार आहे. सध्याच्या कार्यालयाच्या जागी नव्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.           

सध्याच्या नगर परिषद कार्यालयाच्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला शासनाकडून मंजुरी मिळालेली असून 4 कोटी रुपयांचा निधीही आलेला आहे. हा निधी परत जाऊ नये म्हणून तातडीने काम सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत. मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, नगररचनाकार शरद पाटील यासाठी नियोजन करीत आहे.

मारुती मंदिर चौकातील श्रीमंत सरदार अजितसिंहराजे दाभाडे (सरकार)व्यापारी संकुल येथे हे कार्यालय तात्पुरते स्थलांतरीत करण्यात येणार आहे. येथील तीन मुख्य इमारतीमधील सर्वात वरच्या  मजल्यावरील मोठ्या सभागृहामध्ये हे प्रशासकीय कार्यालय सुरू केले जाणार आहे.

या सभागृहात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, पत्रकार कक्ष, मुख्याधिकारी, उपमुख्यधिकारी, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी, यांचे स्वतंत्र कक्ष व प्रशासकीय कार्यालयसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहेत.

तसेच बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, आस्थापना विभाग, भांडार विभाग, उद्यान विभाग, लेखा विभाग,सभा कामकाज विभाग, करसंकलन विभाग, पाणी पुरवठा विभाग, संगणक विभाग, विद्युत विभाग, नगररचना विभाग, प्रधानमंत्री आवास योजना विभाग, महिला बालकल्याण समिती, मिळकत व्यवस्थापक, आवक-जावक, स्वागतकक्ष विभाग असे स्वतंत्र कक्ष राहणार आहेत. नव्या इमारतीचे बांधकाम काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी  तात्पुरती व्यवस्था करून करण्यात येणार आहे.

सध्याच्या  व्यापारी संकुलात सर्व सुविधा असून स्वतंत्र पार्किंग, लिफ्ट, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध आहेत.

सध्याची इमारत पंचेचाळीस वर्षांपूर्वी पूर्ण होऊन तिचे उद्घाटन 31 /10 /76 रोजी  माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार, त्या वेळचे नगरपरिषदेचे नगर विकासमंत्री जगेश देसाई, विरोधी पक्षनेते आमदार उत्तमराव पाटील, मावळचे आमदार कृष्णराव भेगडे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये नगराध्यक्ष कै. नथूभाऊ भेगडे पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत संपन्न झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.