Faf du Plessis retired : द. आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती  

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज (बुधवारी) त्याने आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. पाकिस्तान दौऱ्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर डु प्लेसिसने हा निर्णय जाहीर केला.

फाफ डु प्लेसिसने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘माझ्यासाठी असा निर्णय घेणं खूपच कठीण होतं. पण भविष्याचा विचार करून आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो.

15 वर्षांपूर्वी मला कोणी सांगितलं असतं की मी आफ्रिकेकडून 67 कसोटी सामने खेळणार आहे आणि काही सामन्यांचे नेतृत्व करणार आहे, तर माझा माझ्यावर विश्वास बसला नसता. पण आता पुढील दोन वर्षात दोन T20 विश्वचषक आहेत. त्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे’, असं त्यानं आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

फाफ डु प्लेसिसने आफ्रिकेकडून खेळताना 69 कसोटी सामन्यात 40.02 च्या सरासरीने 4 हजार 163 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतकांचा समावेश आहे. त्यानं आपल्या देशासाठी 36 कसोटी सामन्यांचे नेतृत्व देखील केलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.