Pimpri News: विधवा महिलांना कोरोना योजनेचा लाभ मिळण्यासाठीची वयाची अट शिथील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे कोरोनामुळे विधवा झालेल्या शहरातील महिलांना दिल्या जाणा-या 25 हजारांच्या अर्थसहाय्य योजनेतील वयाची अट शिथील करण्यात आली आहे.  महापालिका हद्दीमध्ये राहणा-या कुटुंब प्रमुखाचे कोरोनाने निधन झाले असल्यास त्याच्या कुटुंबाला मदत करताना संबंधित महिलेच्या वयाची मर्यादा रद्द करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. यामुळे 50 वर्षांपुढील विधवा महिलांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे उपमहापौर हिराबाई घुले यांनी सांगितले.

उपमहापौर घुले म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत कोरोना काळात ज्या महिलांचे पती कोरोना संसर्गाने बाधित होऊन कोरोना आजाराने मृत्यू पावले आहेत. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आत्मनिर्भर  करण्याच्या दृष्टीने महापालिकेने अर्थसहाय्य योजनेत वाढ केली. नागरवस्ती विभागाकडील विधवा अर्थसाहाय्य योजनेत 10 हजार रुपयांऐवजी 25 हजार रुपये इतके अर्थसाहाय्य दिले जात आहे. या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 50 वर्षे पर्यंत असावे अशी अट घातली होती.

कोरोनाच्या दुस-या लाटेत बऱ्याच कुटुंबांतील कर्त्यां व्यतींचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरातील कर्ता व्यक्ती मयत झाल्यानंतर कुटूंबाची वाताहत होते. तसेच ज्या महिलांचे पती हे कोरोना संसर्गाने मृत्यु पावले आहेत. परंतु, काही विधवा महिलांचे वय 50 वर्षे पेक्षा जास्त आहे. अशा सर्व विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 50 वर्षे वयाची अट तत्काळ शिथील करण्याची मागणी मी केली होती. त्याबाबत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये राहणा-या कुटुंब प्रमुखाचे कोरोनाने निधन झाले असल्यास त्याच्या कुटुंबाला मदत करताना संबंधित महिलेच्या वयाची मर्यादा रद्द करण्यास नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल. यामुळे 50 वर्षांपुढील विधवा महिलांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महिला योजनेपासून  वंचित राहणार नाहीत. योजनेअंतर्गत जास्तीत-जास्त विधवा महिलांना आर्थिक सहाय्य लाभल्याने त्यांच्या कुटुंबास हातभार लागणार असल्याचे उपमहापौर घुले म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.