Pune Crime News : मुलीला कुत्रा चावला म्हणून संतप्त आईने त्या कुत्र्याच्याच पिलांचे घेतले प्राण

एमपीसी न्यूज –  पुण्यातील हडपसर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या महिलेने मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एकच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत ही महिला सोसायटीत काठी घेऊन फिरल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली . हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नीता आनंद बीडलान (वय 43) या महिलेने तक्रार दिली असून अनिता दिलीप खाटपे (वय 45) या महिलेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अनिता खाटपे यांच्या लहान मुलीला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. याचाच राग मनात भरून ही महिला सोसायटीतील एकही कुत्रा जिवंत ठेवणार नाही असे म्हणून हातात मोठी काठी घेऊनच सोसायटीत फिरत होती. यामध्ये दोन पिलांना बदडून तिने ठार देखील मारलं. त्यानंतरही दिसेल त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न ती महिला करत होती.

हातात काठी घेऊन फिरत असताना त्या अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाल्या. कुत्र्याला का मारता अशी विचारणा केली असता त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत अरेरावी केल्याचही एका व्हिडिओत कैद झाले आहे.

दरम्यान, कुत्र्याच्या दोन लहान पिलांना या महिलेने मारल्याचे लक्षात आल्यानंतर सोसायटीतच राहणाऱ्या अन्य एका महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.