Wakad News :  गुंडा विरोधी पथकाने पुन्हा एकदा कोयत्यासह यमभाई पकडला

एमपीसी न्यूज – आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात, असे सोशल मिडियावर खुलेआमपणे सांगणाऱ्या कोयता मॅन ऊर्फ यमभाई याला पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला. एकदा प्रसाद मिळूनही यमभाईची खुमखुमी उतरली नाही. त्याने पुन्हा एकदा कोयता घेऊन सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. याबाबत त्याला गुंडा विरोधी पथकाने पुन्हा एकदा अटक केली आहे. त्याच्याकडून आणखी एक कोयता हस्तगत केला आहे.

मयुर अनिल सरोदे (वय 21, रा. दुर्गानगर, आकुर्डी) असे अटक केलेल्या कोयता मॅन ऊर्फ यमभाई याचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी रामदास मोहिते यांनी सोमवारी (दि. 2) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमभाई ऊर्फ मयूर सरोदे याच्याकडे पुन्हा कोयता असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडीतील नगरसेवक विनोद नढे यांच्या कार्यालयाच्या जवळून सरोदे याला अटक केली. त्याच्याकडून आणखी एक कोयता पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आमचा दोन नंबरचा धंदा आहे, असे सांगत कोयत्याचे प्रदर्शन करणाऱ्या यमभाईची व्हिडिओ क्‍लीप सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हारल झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून कोयता हस्तगत केला. एवढेच नव्हे तर त्याची दहशत मोडून काढण्यासाठी तो राहत असलेल्या परिसरातून त्याची धिंडही काढली.

पोलिसांनी काढलेल्या धिंड प्रकरणामुळे त्याची नाचक्‍की झाली. त्यामुळे तो दुर्गानगर परिसर सोडून काळेवाडीत रहायला गेला. मात्र, तिथेही त्याने कोयता बाळगणे सोडले नाही. त्यामुळे गुंडा विरोधी पथकाने त्याला पुन्हा अटक करून त्याच्याकडून कोयता हस्तगत केला. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.