Bhosari:  पुरस्कार म्हणजे सामाजिक कार्याची  पावती  –  सुभाष देसाई 

भोसरीत उध्दवश्री पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज – पुरस्कार म्हणजे  समाजाने  दिलेली कामाची पावती असते. चांगले काम केल्यास समाज त्याची दखल घेतो. समाजात गुणवंता वाढविण्यासाठी, समाजाची सेवा करणा-या गुणी जणांचा सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक करणे गरजेचे आहे. सन्मानातून त्यांच्या चांगल्या गुणांची बूज राखली जाते, असे मत शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उध्दवश्री पुरस्कार सोहळा समितीच्यावतीने दिले जाणा-या उध्दवश्री पुरस्काराचे देसाई यांच्या हस्ते वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आज (बुधवारी)झालेल्या कार्यक्रमाला  खासदार  श्रीरंग बारणे, शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक,  पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राज्य संघटक व जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,  शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे,  नगरसेवक प्रमोद कुटे, पुरस्कार समितीचे अध्यक्ष माधव मुळे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व पुरस्कार समितीचे निमंत्रक कामगार नेते इरफान सय्यद, सचिव गुलाब गरुड आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, शिवसेनेने  थोर, गुणिजनांचा वेळोवेळी गौरव केला आहे. गुणी व्यक्ती विरुद्ध विचाराची असली तरी त्यांचा शिवसेनेने सन्मान केला. ती व्यक्ती आपल्या विचारांची नाही अशा कधीच विचार केला नाही. गुणिजनांच्या सत्काराची परंपरा शिवसेनेने कायम ठेवली आहे.

उध्दवश्री पुरस्काराची ज्यांनी सुरवात केली ते दिवंगत बाबासाहेब धुमाळ हे शिवसेनेच्या विचारणे झपाटलेले होते. काम करत असताना त्यांना अनेक अडचणी, अडथळे आले. त्यांनी त्यावर यशस्वीपणे मात करत शिवसेनेचे काम केले. पक्षावरील निष्ठा कायम ठेवली. या पुरस्कार वितरणासाठी त्यांनी मला एकदा बोलविले होते. परंतु, मला येता आले नाही. ती हळहळ माझ्या मनात घर करून राहिली होती. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आज आलो आहे. बाबासाहेब यांच्या पश्चातही उध्दवश्री पुरस्काराची  परंपरा कायम ठेवली, ही कौतुकाची बाब आहे, असेही देसाई म्हणाले.

उध्दवश्री पुरस्काराने बाळासाहेब लांडगे (क्रीडा), गोपाळ देवांग (क्रीडा), संजय नहार (सामाजिक), राजन खान (साहित्यिक), प्रभाकर ओव्हाळ (ज्येष्ठ साहित्यिक), दिप्ती चंद्रचुड (औद्योगिक), भाऊसाहेब क-हाडे (कला), डॉ. पंकज बोहरा (वैद्यकीय), देवदत्त कशाळीकर (छायाचित्रकार), एम. ए. हुसेन (सामाजिक), राहुल धोत्रे (क्रीडा), कैलास पुरी (वार्ताहर), भूषण तोष्णीवाल (अंध सनदी लेखापाल), डी. एम. खुणे (सनदी लेखपाल), गोविंद दाभाडे (सरस्वती शिक्षण मंडळ, संस्थापक), मिलींद शिंदे (गायक), किशोर ढोकळे (कामगार नेते), बबनराव कांबळे (दै. सम्राट संपादक) आदींचा गौरव करण्यात आला. दिवंगत जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ यांच्या नावाने 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.