Bhosari news: बालनगरी प्रकल्प गुंडाळला, आता होणार ललित कला अकादमी

बालनगरी प्रकल्पावर केलेला 20 कोटी रुपये खर्च पाण्यात जाणार

एमपीसी न्यूज – लहान मुलांना बालशिक्षण हा विषय डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणारा बालनगरी प्रकल्प टप्पा एकचे काम पूर्ण झाल्यावर आता गुंडाळण्यात येणार आहे. या प्रकल्पाऐवजी केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी ही जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने बालनगरी प्रकल्पावर केलेला 20 कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे.  

भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉक अंतर्गत मोकळ्या जागेतील भुखंड हा ताबा पावतीद्वारे सन 1984  मध्ये महापालिकेकडे एमआयडीसीकडून हस्तांतरीत झालेला आहे. त्याचे क्षेत्रफळ 60 हजार 378 चौरस मीटर आहे. या भूखंडावर प्रस्तावित आरक्षणाच्या विकासाच्या अनुषंगाने बालनगरी प्रकल्प विकसित करण्याच्या विचाराने स्थापत्य विभागामार्फत प्रकल्प विकास सुरू करण्यात आला.

या प्रकल्पात मुख्यत: लहान मुलांना बालशिक्षण हा विषय डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्रातील सामान्य ज्ञान देणा-या सेवा व संस्थांची माहिती देण्यासाठी बांधकाम सुरू करण्यात आले. या ठिकाणी लहान मुलांना शिक्षणासाठी अग्निशमन, रूग्णालय, बँकींग, पोलीस ठाणे, टपाल कार्यालय अशा प्रकारच्या सेवांची माहिती देणे, मनोरंजनासाठी अ‍ॅम्पीथियटर आदी कक्ष निर्माण करणे प्रस्तावित आहे.

बालनगरी प्रकल्पातील टप्पा एकचे काम 25 मे 2018 रोजी पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सुमारे 5 हजार चौरस मीटर इतके बांधकाम झाले आहे. त्यावर सुमारे 20 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचे पुढील टप्प्यात बांधकाम करण्यापूर्वी हा प्रकल्प चालविण्याकरिता एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आला. त्याला कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही. या कालावधीत राज्यातील विविध शहरांमध्ये स्थित असलेल्या चित्रकला महाविद्यालयांकडून तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या प्रसिद्ध संस्थेकडून राज्यातील कला विकासासाठी केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी ही जागा देण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचरणे यांनी राज्यातील विविध प्रतिनिधींसमवेत जुलै महिन्यात या प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पाची जागा त्यावरील बांधकामासह ललीत कला अकादमीच्या विभागीय केंद्राच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने ही जागा महापालिका आणि राज्य सरकारमार्फत त्यावरील बांधकामासह ललित कला अकादमीस मिळावी, अशी विनंती केली.

या प्रकल्पाची जमीन ही एमआयडीसीकडून विनामूल्य हस्तांतरीत झालेली असल्याने हस्तांतरीत करण्यापूर्वी एमआयडीसी तसेच राज्य सरकारची मान्यता घेणे आवश्यक राहणार आहे.

या ठिकाणी आतापर्यंत सुमारे 5 हजार चौरस मीटर इतके बांधकाम महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. हे बांधकाम वापरण्यायोग्य असून भविष्यातील बांधकाम ललित कला अकादमी मार्फत त्यांच्या निधीतून करण्यात येणार आहे. तरी अस्तित्वातील बांधकाम हस्तांतरीत करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या मान्यतेने त्यावरील बांधकामासह ललित कला अकादमी या संस्थेस नाममात्र दराने देण्यास सत्ताधारी भाजपने विनाचर्चा मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.