Chinchwad news: कोरोना विरोधातील लढाई! चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपये

एमपीसी न्यूज –  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे  सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुके पुणे विभाग यांनी जिल्ह्यातील धार्मिक संस्थांना कोव्हीडसाठी आर्थिक मदतीने आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज (शुक्रवारी) दिला आहे. याबाबतची माहिती  देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.

राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे जिल्ह्यातील धार्मिक संस्थांनी कोव्हीड केंद्र अथवा आर्थिक मदतीचे आवाहन पुणे जिल्हा सह धर्मदाय आयुक्तांनी केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने खारीचा वाटा म्हणून शासनास आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते.

यानुसार आज विधानभवन पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्याकडे 11 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुक्के , चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज  देव, विश्वस्त विश्राम देव , आनंद तांबे,  राजेंद्र उमाप, विनोद पवार हे उपस्थित होते.  यावेळी सह – धर्मदाय आयुक्त व विश्वस्त मंडळाच्या हस्ते सदर रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आला.

कोरोना काळात  राज्य शासनामार्फत कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवत आहोत . यात राज्यातील धार्मिक संस्थाही हातभार लावत आहेत ही कौतुकाची बाब असल्याचे अजित पवार यांनी सांगत चिंचवड देवस्थान ट्रस्टचे आभार मानले. चिंचवड देवस्थान ट्रस्टने गतवर्षी ससून रुग्णालयास  व्हेंटिलेटर खरेदीसाठी एकवीस लाख रुपयांची देणगी दिली होती. या देवस्थानचे सामाजिक कार्यही खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सह धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे कोविड काळातील काम चांगले असल्याचे पवार पुढे बोलताना म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.