Bhosari News : जाधववाडी येथे होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

एमपीसी न्यूज – जाधववाडी येथे 28 ते 31 मे या चार दिवसांच्या कालावधीत बैलगाडा शर्यत होणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजपचे माजी महापौर आणि आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक नितीन काळजे आणि राहुल जाधव यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे. ही भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असल्याचा दावा आयोजकांकडून केला जात असून सुमारे दीड कोटी रुपयांचे बक्षिसे या शर्यतीत दिली जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी 16 डिसेंबर 2021 रोजी सशर्त उठवली. त्यानंतर मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत आमदार सुनील शेळके यांनी भरवली. त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे दुसरी शर्यत घेतली. आता आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे.

केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 28 मे रोजी सकाळी सात वाजता शर्यतीचे उदघाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि विधानपरिषद सदस्य गोपींचद पडळकर, तर तिसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील हे शर्यतीला हजर राहणार आहेत. 31 मे रोजी सकाळी सात वाजता बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वितरण होईल. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि श्रीक्षेत्र नारायणपूरचे अण्णामहाराज यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होणार आहे.

या शर्यतीत तीन चारचाकी, 103 दुचाकी, 22 तोळे सोने, दहा चांदीच्या गदा यासह लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. बक्षिसांची रक्कम सुमारे दीड कोटी रुपये एवढी आहे. तर संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रथम क्रमांकाच्या बैलगाडा मालकाला 15 लाख रुपये आणि एक बोलेरो जीप बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. शर्यत झाल्यानंतर शर्यतीच्या बैलांचा रॅम्प वॉक देखील घेण्यात येणार आहे. या शर्यतीसाठी देशाच्या विविध भागातून बैलगाडा प्रेमी येणार आहेत. शर्यतीला येणा-या प्रत्येकाला पाण्याची दिली जाईल. 50 हजार टीशर्ट, टोप्या आणि छत्र्या तयार ठेवण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.