Pimpri News : स्मार्ट सिटीतील सब कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्वात मोठा झोल, सर्व नियम गुंडाळून सब-सब कॉन्ट्रॅक्ट

एलएन्डटी कंपनी कामाबाबतच्या सुनावणीत नगरसेविका सीमा सावळे यांनी उघड केला घोटाळा

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी अंतर्गत एल अन्ड टी कंपनीला दिलेल्या सुमारे 250 कोटी रुपयांच्या कामांचे नियमबाह्य पध्दतीने सब कॉन्ट्रॅक्ट देऊन महापालिकेची  मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे. एकाने दुसऱ्याला तिसऱ्याला असे सब-सब कॉन्ट्रॅक्ट देऊन मूळ निकषानुसार काम न करता कामाच्या दर्जाची वाट लावून टाकली.

सल्लागाराने स्मार्ट सिटी कंपनी ऐवजी ठेकेदाराचे हित जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ही बाब अत्यंत संतापजनक आणि स्मार्ट सिटीच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारी आहे. सब-सब कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये फार मोठा घोळ असून केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि करदात्यांची प्रचंड मोठी फसवणूक झाल्याचा आरोप करत सखोल चौकशी करावी, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली.

स्मार्ट सिटीचे सीईओ महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या पुढे झालेल्या सुनावणीत नगरसेविका सावळे यांनी चौकशीची मागणी केली. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामांत प्रचंड मोठा घोटाळा असल्याचे नगरसेविका सावळे यांनी वारंवार निदर्शनास आणले. महापालिका आयुक्त हेच स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याने सावळे यांनी त्यासंदर्भात गेले वर्षभर सतत त्याच्याकडे पत्रव्यवहार केला. स्मार्ट सिटीतील घोळ मोठा असल्याने महापालिका प्रशासनाने त्यांच्या पत्रांना उत्तर देणेसुध्दा टाळले होते. अखेर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व पत्रांची दखल घेत सुनावणी सुरू केली आहे. आता आयुक्त राजेश पाटील या विषयावर नेमका काय आदेश देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

निवेदनात नगरसेविका सावळे म्हणाल्या, एल. एन्ड टी कंपनीला दिलेल्या कामांवर प्रशासन मुद्दामून दुर्लक्ष करत आहेत. सब कॉन्ट्रॅक्टिंगबाबत निविदेतील सर्व अटीशर्थींचे कसे उल्लंघन झाले. निविदेच्या अटी – शर्तीच्या अनुषंगानेच अंतिमत: मास्टर सर्विस एग्रीमेंट तयार करण्यात येते. त्याच्या तरतुदींचा भंग झालेला असताना बेकायदेशीर कामकाजाला पाठीशी घालण्याचे काम राजकिय दबावापोटी सुरू आहे. एल अन्ड टी कंपनीने परस्परपणे व बेकायदेशीरपणे सब कॉन्ट्रॅक्टिंग केलेले आहे हे वास्तव आहे. हेच काम पुढे सब सब कॉन्ट्रॅक्टिंग केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.